आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर टीका करत असताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली होती. ते म्हणाले होते की, 'माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे' यानंतर आढळरावांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहावी
अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर देताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, 'थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहावी आणि त्यानंतरच वक्तव्य करावे. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच टीका करत आहे. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय?' असा सवालही आढळरावांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना आढळराव पुढे म्हणाले की, 'बायपास रस्त्याचे काम मी खासदार असताना सुरू करण्यात आले होते. मात्र या रस्त्याच्या कार्यक्रमाला मला डावलण्यात आले. माझा, मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिथे नव्हता. मला या कार्यक्रमात बोलवण्यात यावे एवढीच माझी अपेक्षा होती. तसेच पुढे ते म्हणाले की, कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलायला हवे. स्थानिक विषयांमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रश्न येतो कुठे?' असा सवालही आढळरावांनी केला.
कुठून सुरू झाला वाद?
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्यावरून अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते केले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुलाही केला होता. तसेच हा रस्ता आपण मंजूर केला आहे म्हणून याचे भूमीपूजन करतोय. कोल्हे हे फक्त शोबाजी करत असल्याचे आढळराव म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.