आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना निर्बंध:लसीचे दोन्हीही डोस घेतलेल्यांना निर्बंधांमधून सूट मिळावी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; अजित पवारांनी दिली माहिती

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस उपलब्ध होत नसल्याने लसीचा वेग मंदावला

राज्यात कोरोनाचा धोका पाहता लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जावेत अशी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. मात्र रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नाही यासोबतच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश आहेत. पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयावर भाष्य केले आहे. पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केले.

निर्बंधांना सूट देण्याविषयी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले गेले पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी देण्यात आली पाहिजे, असे माझे वयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे' असे अजित पवार म्हणाले आहेत. यामुळे आता लसीकरण पूर्ण झालेल्यांना निर्बंधांमधून सूट दिली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढचे 100 ते 120 दिवस हे महत्त्वाचे
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, 'प्रत्येकाची मते ही वेगवेगळी आहेत. काही जणांना वाटते की, पुढचे 100 ते 120 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले गेले पाहिजे. मात्र अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. अशी बेफिकिरी योग्य नाही' असेही पवार म्हणाले.

लस उपलब्ध होत नसल्याने लसीचा वेग मंदावला
अजित पवारांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना लसींच्या पुरवठ्यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'केंद्र सरकारकडून लोकसंख्या लक्षात घेऊन कोरोना लस मिळायला हवी. मात्र, असे होत नाही. लस उपलब्ध होत नाही यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. जुलैमध्ये लस मिळेल असे केंद्राकडून सांगण्यात आले होते. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही'

बातम्या आणखी आहेत...