आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतीच्या रब्बी हंगामात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची पुणे परिमंडलातील यंत्रणा सज्ज झाली आहे. कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या कृषी वाहिन्यांवरील नादुरुस्त तसेच जळालेले रोहित्र तातडीने बदलण्यासोबतच वीजयंत्रणेची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. या नियोजनानुसार केवळ तीन दिवसांच्या कालावधीत नादुरुस्त तसेच जळालेले कृषिपंपांचे एकूण 166 रोहित्र युद्धपातळीवर बदलून देण्यात आले आहेत.
दरम्यान पुणे परिमंडल अंतर्गत ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती ग्राहकांनी संबंधित कार्यालयात किंवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना द्यावी असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.
तसेच पुणे परिमंडल अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामधील नादुरुस्त रोहित्रांची केवळ ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’द्वारे माहिती देण्यासाठी दैनंदिन नियंत्रण कक्षाचा 7875767123 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध आहे.वीज वितरण यंत्रणेत रोहित्राचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या यंत्रणेचा रोहित्र हा आत्मा आहे. सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरु आहे. त्यामुळे कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे नियोजन महावितरणच्या मुख्यालयाकडून करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी पुणे परिमंडलामध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे परिमंडल अंतर्गत असलेल्या आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे 87 कृषी रोहित्रे 29 नोव्हेंबरपर्यंत नादुरुस्त झाले होते. हे सर्वच रोहित्र केवळ तीन दिवसांत बदलण्यात आले आहेत. तर 29 नोव्हेंबर ते मंगळवारपर्यंत (दि. 6) जळालेले व नादुरुस्त झालेले 166 रोहित्र बुधवारपर्यंत (दि. 7) केवळ तीन दिवसांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत.
पुणे परिमंडल अंतर्गत तीन फेजचा वीजपुरवठा करणारे अकृषक व कृषक असे एकूण 36 हजार 786 रोहित्र आहेत. परंतु, रोहित्र नादुरुस्त किंवा जळण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. सद्यस्थितीत पुणे परिमंडलात 128 रोहित्र अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध असून सर्व कार्यालयांना ऑईलचा मुबलक पुरवठा करण्यात आला आहे. सोबतच नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ दुरुस्तीसाठी पाठविण्यात येत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.