आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:मंडई गणपतीची प्रथमच होणार मंदिरात प्राणप्रतिष्ठापना, उत्सवाला मुरड घालून 127 वर्षांत प्रथमच साधेपणाने गणेशोत्सव

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मूर्ती मंदिरातून मंडपात हलवणार नाही

पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सव परंपरेत मानाचे स्थान असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या वतीने १२७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी भव्य स्वरूपाची दिमाखदार सजावट करून वैभवशाली उत्सव साजरा करणारे हे मानाचे मंडळ साधेपणाने उत्सव साजरा करून एक आदर्श अन्य मंडळांसमोर ठेवणार आहे. ‘या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. मंडळाच्या शारदा गजाननाची गेल्या १२७ वर्षांत या वर्षीच्या गणेशोत्सवात प्रथमच मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट आदी या वेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, दरवर्षी अखिल मंडई मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाचे १२५ वे वर्षदेखील विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. परंतु पुण्यात कोरोनामुळे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला मुरड घालून मंडळातर्फे साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे.

मूर्ती मंदिरातून मंडपात हलवणार नाही
- मंडळाच्या १२७ वर्षांच्या परंपरेत प्रथमच शारदा गजाननाची मूर्ती मंदिरातून मंडपात हलवण्यात येणार नाही
- मंदिरातच सर्व धार्मिक विधी केले जाणार आहेत. या वेळी सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे
- शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर आणि महाराष्ट्रातील भाविक येतात. या वेळी सॅनिटायझर, मास्क घातल्याशिवाय कुणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही.
- मानाच्या आणि दीर्घ परंपरा असणाऱ्या मंडळांनी केलेल्या कृतीचे अनुकरण अन्य मंडळे करतात, हे जाणून मंडळाने साधेपणाने उत्सव करण्याचा निर्णय घेतला आहे.