आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्गबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर मुंबईतील महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड उपचारांसाठी सज्ज राहावे, अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. ६० वर्षे वयावरील नागरिक, महानगरपालिका कर्मचारी या सर्वांना मास्क सक्ती करण्यात आल्याचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी स्पष्ट केले.
कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी शुक्रवारी (ता.१०) तातडीची आढावा बैठक घेतली. बैठकीत चहल म्हणाले की, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रुग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेसोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणी रुग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे.
पुण्यातील १२३ रुग्णालयांत माॅक ड्रील : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आदेशावरून रुग्णालयांची सज्जता तपासण्यासाठी सोमवारी पुण्यातील १२३ रुग्णालयांसह औंध जिल्हा रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्यात आले. कोरोना रुग्णांकरिता बेडची उपलब्धता, ते सुस्थितीत आहेत का, ऑक्सिजनची व्यवस्था, तैनात कर्मचारी याबाबतची चाचपणी करण्यात आली.
महाराष्ट्रात ५० टक्के रुग्ण घटले : साेमवारी राज्यात ३२८ नवे काेराेना रुग्ण आढळले आहेत. तथापि, दैनंदिन आढळणाऱ्या बाधितांची संख्या पाहता रुग्णसंख्या ५० टक्क्यांनी घसरली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
६० वर्षे वयावरील व्यक्तींना अधिक धाेका
कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका आहे. यामुळे ६० वर्षेपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या नागरिकांनी मास्कचा सातत्याने उपयोग करावा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. महानगरपालिका कार्यालयांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना मास्क लावण्याची विनंती करावी, असे चहल यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.