आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिक आक्रमक, राज्यात अलर्ट:कुर्ल्यात मंगेश कुडाळकरांचे कार्यालय फोडले; नगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी शुक्रवारी मुंबई व अहमदनगर येथील बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ला केला. यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचा बाका प्रसंग उद्भवला. या घटनाक्रमामुळे गृह विभागाने राज्यात अतिदक्षतेचा इशारा जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते शिंदे गटाच्या गटात सामील झाले. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुडाळकर यांच्या विरोधात मोर्चा उघडला. आज मुंबईतील त्यांच्या कार्यालयावर चाल करून त्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागाची तोडफोड केली. तर नगरमध्ये बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासले. यावेळी शिवसैनिक संतप्त झाले होते त्यांनी घोषणाबाजीही केली.

हिंसक घटनेनंतर राज्यात अलर्ट

शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांचे कुर्ल्यातील कार्यालय फोडले. तसेच नगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासल्यानंतर गृहविभाग दक्ष झाला असून राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

कुडाळकरांच्या फोटोवर घाव

संतप्त शिवसैनिकांनी कुडाळकर यांच्या कार्यालायावर चाल केल्यानंतर कार्यालयाच्या दर्शनी भागावर नामफलक आणि कुडाळकर यांचा फोटो होता त्यावर लोखंडी काठीने घाव घालत त्यांचा फोटो फोडला त्यानंतर नावाचीही तोडफोड केली.

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नगर येथील पोस्टरला काळे फासताना शिवसैनिक
बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नगर येथील पोस्टरला काळे फासताना शिवसैनिक

एकनाथ शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे

अहमदनगरमध्ये आज शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसले त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे शहरात असलेल्या एका पोस्टरवर काळे फासले. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कुडाळकर कुर्ला, नेहरुनगरचे आमदार

शिवसेनेचे (ShivSena) निष्ठावंत समजले जाणारे आमदार मंगेश कुडाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत.

आधी ठाकरेंसोबत नंतर शिंदे गटात

आमदार मंगेश कुडाळकर यांनी स्पष्ट केले होते की, गुवाहटीला जाण्याआधी सकाळपर्यंत माझा विचार नव्हता, मात्र काही कारणाने जावे लागत आहे, पण त्यांनी ठोस कारण तेव्हा सांगितले नव्हते. आमदार मंगेश कुडाळकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते, त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...