आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात झाली दोन राजेंची भेट:संभाजीराजेंची भेट घेतल्यानंतर उदयनराजे म्हणाले- संभाजीराजे जेंटलमन आहेत ते बोलणार नाहीत, मी बघतो एक-एकाला! सरकारसमोर ठेवल्या 6 मागण्या...

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज पुण्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांची भेट झाली

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही राजेंनी माध्यमांशी संवाद साधला. 'राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. आजचे राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे उद्या समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?' असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी केला.

खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. यावेळी उदयनराजे म्हणले, मला सर्वांना सांगावसं वाटतं, आम्ही दोघं एकाच घराण्याचे आहोत. संभाजीराजे किंवा मी दुफळी निर्माण केली नाही. राज्यकर्त्यांना आरक्षण द्यायचे असते तर मागेच दिले असते. त्यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झालेत. उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयनराजे, ना संभाजीराजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केलं जाईल..अशी वेळ येऊ देऊ नका, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, मंडल आयोगाने ओबोसींना आरक्षण दिले. त्यावेळी मी दिल्लीतच होतो. तेव्हा दिल्लीत आरक्षण विरोधक आणि समर्थकांची रस्त्यावरच भोसकाभोसकी सुरु होती. मी दिल्लीत होतो ते मला आठवतंय. तुम्ही इशू बेस पॉलिटिक्स करा. समाजात तेढ निर्माण करू नका. कोर्ट कचेऱ्यावर मला अजिबात आता विश्वास नाही, काय घडणार हे मला माहिती आहे, असेही ते म्हणाले.

संभाजीराजेंना माझा पाठिंबा
ते पुढे म्हणाले, माझा संभाजीराजेंना पाठइंबा आहे. मराठ्यांना आरक्षण हे एकच ध्येय आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली. निवडून आले म्हणजे आपलं सगळं असं समजू नका. लोकशाहीचे हे राजे आहेत, त्यांना जाब विचारला पाहिजे. माझे ठाम मत आहे, आडवा आणि गाडा, जाब विचारा.. सुरुवात माझ्यापासून करा. आमच्या वाड्यावर येऊन विचारा, माझ्याप्रमाणे सर्वांना विचारा.. खरं खोटं करा.. किती काळ संभ्रमावस्थेत ठेवणार, असा सवालही त्यांनी केला.

पक्षबिक्ष मध्ये आणू नका
ते पुढे म्हणाले की, इथे पक्ष-बिक्ष आणू नका. मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा प्रश्न समाजाचा आहे. सामाजिक व्यवस्थेत फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याने कायदा करावा. विशेष अधिवेशन बोलवा आणि कायदा करा. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडा… सभागृहात एक आणि बाहेर एक असं बोलू नका. विशेष अधिवेशन बोलवा, श्वेतपत्रिका काढा. कुणी कोणाला फूस लावली ते लोकांना कळेल. बाकीच्यांना आरक्षण मिळालं, तसं मराठ्यांना मिळायला हवं. लोकसंख्येच्या हिशेबाने देणार असेल तर कॅल्क्युलेशन करा, असेही ते म्हणाले.

'भेटून आनंद झाला'- संभाजीराजे
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, आज बऱ्याच वर्षांनंतर आम्ही भेटलो. सातारा आणि कोल्हापूर घराणे मराठा समाजाच्या मुद्यावर एकत्र आलोय. या भेटीमुळे मनापासून आनंद झाला. उदयनराजे यांनी परवाच भेट घेण्यासाठी बोलावले होते, पण तेव्ही भेट होऊ शकले नाही. पण आजही भेट झाली असून आनंद झाला आहे. आम्ही सरकारसमोर सहा मागण्या ठेवल्या आहेत, समाज बोलला आहे, आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधी सुद्धा बोलले पाहिजे. आमच्या सहा मागण्या लवकरात लवकर मान्य करा, त्यावर तोडगा काढावा, अशी मागणीही संभाजीराजेंनी केली.

अजित पवारांचा फोन आला नाही
अजित पवार आणि छत्रपती शाहूंच्या भेटीवर संभाजीराजे म्हणाले की, अजित पवार हे छत्रपती शाहू यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेले असतील. ते भेटायला जातील याबद्दल माहिती नव्हते. जर या भेटीतून काही तोडगा निघत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. मला व्यक्तिगत कल्पना नव्हती. पण पॅलेसमधून मला फोन आला होता. अजितदादांचा मला कोणताही फोन आला नाही, असेही संभाजीराजेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...