आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी भाषा गौरव दिन:शासकीय निवेदने सोप्या भाषेत निघाल्यास मराठी होईल अधिक समृद्ध : डॉ. जयंत नारळीकर

पुणे / जयश्री बोकील2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी भाषा गौरव दिन आणि विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत नारळीकर यांची मुलाखत

साहित्य आणि विज्ञान यांना सर्जनशीलतेचा धागा जोडून ठेवत असतो. आज (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन तर उद्या (२८ फेब्रुवारी) राष्ट्रीय विज्ञान दिन. त्यानिमित्त यंदा नाशिक येथे होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष असलेले विख्यात संशोधक -शास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर यांच्याशी मराठी भाषा व विज्ञानविषयक साहित्य याबाबत ‘दिव्य मराठी’ने साधलेला खास संवाद.

प्रश्न : मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल बोलताना एक वैज्ञानिक म्हणून इंटरनेट, स्मार्टफोन अशा आधुनिक आयुधांवरील मराठीच्या वापराकडे आपण कसे पाहता ? यामुळे मराठी भाषा विस्तारते आहे की आक्रसते आहे असे आपल्याला वाटते ?
उत्तर : विज्ञान युगात आज नवनवीन संसाधने (अॅप्स) येत असतात. ती सगळी मराठीतूनही सक्षमतेने वापरता आली पाहिजेत. त्यांचा मराठीतून भरपूर वापर झाला पाहिजे. त्यातून मराठी भाषा नव्या युगात टिकेल, वाढेल.

प्रश्न : मातृभाषा म्हणून मराठीबद्दलची आस्था आणि ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीबद्दलची आजच्या काळातील अपरिहार्यता यातील तोल कसा साधला जाईल?
उत्तर : प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिल्यास ते अधिक प्रभावीपणेे समजेल, मुलांवर ताण येणार नाही व मराठी भाषा टिकेल. कॉलेजमध्ये विज्ञान, गणित आदी शिकण्यासाठी इंग्रजीचाही अभ्यास करावा, मग ते विषय इंग्रजीतून शिकणे फार कठीण जाणार नाही.

प्रश्न : येत्या काळात मराठी भाषेच्या समृद्धीसाठी राजकीय प्राधान्यक्रम काय असावा? याबाबत तुम्ही कसे दिशादर्शन कराल?
उत्तर : त्यासाठी सगळी शासकीय निवेदने मराठीतून असावीत, परंतु त्यांची भाषा सोपी, सहज समजेल अशी असावी. एखादा बोजड शब्द देणे अनिवार्य असेल तर त्याचा अर्थ द्यावा, जेणेकरून त्याचे आकलन सुलभ होईल.

प्रश्न : . जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी साहित्यिकांची भूमिका काय असावी?
उत्तर : साहित्यिकांनी वैज्ञानिकांबरोबर चर्चा करून नवे विज्ञान थोडे तरी समजावून घ्यावे, त्याचे समाजावर काय परिणाम होऊ शकतात, याची चर्चा करावी आणि ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका बजावावी.

प्रश्न : मराठी भाषेतील विज्ञानविषयक साहित्याबाबत तुम्ही समाधानी आहात का?
उत्तर : नाही. आणखी बरेच विज्ञानविषयक साहित्य निर्माण व्हायला हवे. इंग्रजीत एकूणच साहित्य मुबलक आहे.

प्रश्न : सध्या देशातील शैक्षणिक अभ्यासक्रमात अवैज्ञानिक संकल्पना रुजवल्या जात असल्याचा आरोप होत आहे, याकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर : अवैज्ञानिक कल्पना दिसल्यास पुस्तक निर्मात्याला जाब विचारायला हवा. निदान मुलांच्यासाठी असे लेखन बाद करावे.

प्रश्न : कोरोनाविषयक संशोधन हे विज्ञानाचे एक रूप, फैलाव रोखण्यासाठी देवळे, मठ, देवस्थाने बंद केली गेली. दुसरीकडे वैज्ञानिकांनी नव्याने शोधलेल्या कणांना ‘गॉड पार्टिकल’ अशी संज्ञा दिली. मग विज्ञानवाद आणि दैववाद, हा विरोधाभास का?
उत्तर : गॉड पार्टिकल हे नाव माध्यमांनी दिले आहे. वैज्ञानिकांनी Higgs-Boson हे नामकरण केले आहे. त्याचे वर्णन करताना तो कण जगाच्या अगदी सुरुवातीला असावा, असा एक तर्क आहे, म्हणून कुणीतरी त्याचं देवाजवळचा असं वर्णन केलं होतं.

तुम्ही विज्ञानविषयक साहित्याकडे कसे वळलात? या लिखाणासाठी तुम्ही आवर्जून मराठी भाषा का निवडली ?
विज्ञानविषयक पुस्तकांचे भरपूर वाचन करून त्यांचा आस्वाद घेतला. तशी अनुभूती मराठी वाचकांनादेखील द्यावी, असे वाटले. सामान्य लोकांना विज्ञान सोपे करून सांगावे, त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक दिशेकडे वळवण्याचा प्रयत्न करावा, असाही माझा त्यामागे हेतू होता.

बातम्या आणखी आहेत...