आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्हाडा मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज परीक्षा होणार होती. मात्र तत्पूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी उशिरारात्री एक व्हिडिओ जारी करत, रविवारी होणारे पेपर रद्द केल्याची माहिती दिली. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
अमिताभ गुप्ता म्हणाले की, म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
त्या आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळून आले आहेत. तसेच, काहींचे मोबाइल नंबर देखील मिळाले आहेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचेही त्यांनी सांगितले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण
म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता. असे म्हणता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पेपरफुटीवर आपले स्पष्टीकरण दिले. आज म्हाडाची परीक्षा होणार होती, त्यापुर्वी आव्हाड यांनी रात्री ट्विट करत परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले, त्यानंतर राज्यात विरोधात बसलेल्या भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच परिक्षेसाठी लांबून आलेल्या विद्यार्थ्यांनीही राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आज दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिले.
ठाकरे सरकारला फक्त टक्केवारीत रस
विधानपरिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी, ठाकरे सरकारला फक्त टक्केवारीतच रस असल्याचे म्हटले आहे. "प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात. बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. ते स्वतःच मागील आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परीक्षामध्ये घोटाळे होणार आहेत, त्याला बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यमातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परीक्षा रद्द का करावी लागली. यावरून सिद्ध होते की प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे. एक-एक पै गोळा करून परीक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी त्यांना काहीही देणेघेणे नाही", असा आरोप गोपीचंद पडळकरांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.