आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

94वे साहित्य संमेलन:साहित्य संमेलन भाषेचा उत्सव; ‘विज्ञाननिष्ठा’ किती महत्त्वाची हे मांडण्याची संधी मिळेल

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथे मार्च महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य महामंडळाच्या बैठकीत डॉ. नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने हे पद दिले जावे या नव्या परंपरेतले डॉ. नारळीकर हे तिसरे मानकरी ठरले. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं मला आव्हानात्मक वाटतं. संमेलन हा भाषेचा उत्सव असतो. अशा व्यासपीठावर ‘विज्ञाननिष्ठा’ किती महत्त्वाची आहे हे मांडण्याची संधी मला मिळते आहे याचा आनंद आहे, अशी भावना डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी डॉ. नारळीकर यांनी झूम मीटिंगद्वारे संवाद साधून विज्ञाननिष्ठतेचा जणू प्रारंभच केला.

जबाबदारीची जाणीवही मला आहे. आज तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढला आहे, पण विज्ञानवाद रुजला आहे असं म्हणता येणार नाही. साहित्य हा विज्ञानवाद रुजवण्याचा मार्ग असू शकतो ही माझी भूमिका असल्याने मी विज्ञानविषयक लेखनास प्रवृत्त झालो. संमेलनाच्या व्यासपीठावरून आणि नंतरही मी ही भूमिका मांडत राहीन असेही ते म्हणाले.

मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी ते म्हणाले, ‘कुठल्याही संकल्पना प्राथमिक आकलनासाठी मातृभाषेतून समजून घेतल्या पाहिजेत. मुलांना सुरुवातीपासून इंग्रजी भाषेत शिकवण्याचा आग्रह धरणारे पालक भविष्यातील मातृभाषेच्या भावी वाचकांवरच घाला घालतात. इंग्रजी भाषा जरूर यावी, पण प्रारंभिक आकलन मातृभाषेतच असावे.

डॉ. जयंत नारळीकर यांचे साहित्यिक, वैज्ञानिक कर्तृत्व
*जयंत विष्णू नारळीकर *वडील गणितज्ञ आणि आई संस्कृततज्ञ *शालेय शिक्षण वाराणसी येथे * केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण * ज्येष्ठ शास्त्रज्ञ सर फ्रेंड हॉइल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी * गुरुत्वाकर्षणावरील सिद्धांत जागतिक स्तरावर ‘हॉइल - नारळीकर सिद्धांत’ म्हणून प्रसिद्ध * १९७२ मध्ये भारतात परतले * टाटा मूलभूत संशोधन संस्थेत खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख * १९८८ मध्ये पुण्यात आयुका संस्थेचे संचालक * पद्मविभूषण सन्मानाने गौरव * राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण सन्मान

किर्लोस्करांचे ‘भाकीत’ साकार
डॉ. नारळीकरांनी जुन्या संदर्भाचा गमतीदार उल्लेख केला. किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंदराव किर्लोस्करांसाठी मी काही लेखन केले. तुम्ही पुढे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल असे ते मला म्हणाले होते. मात्र ते शक्य नसल्याचे मी म्हटलो होतो. कारण, मी स्वत:ला साहित्यिक समजत नाही. मात्र किर्लोस्करांचे तेव्हाचे ‘भाकीत’ आज खरे ठरले...

साहित्यसंपदा : *वामन परत न आला *अभयारण्य *यक्षांची देणगी * टाइम मशीनची किमया * याला जीवन ऐसे नाव *आकाशाशी जडले नाते *विज्ञानाची गरुडझेप *विश्वाची रचना * नभात हसरे तारे *चार नगरांतील माझे विश्व (साहित्य अकादमीप्राप्त)इत्यादी.

पुणेकरांचंच ‘काैतिक’ भारी पडलं
नाशिक | साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची घाेषणा करण्याची पत्रकार परिषद ४ वाजता हाेती. त्याच्या आधीच्या फक्त दीड तासात डाॅ. जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामाेर्तब झाले. ताेपर्यंत कथाकार भारत सासणे हेच संमेलनाध्यक्ष हाेणार हे अंतिम हाेते. मग असे काय झाले की, सासणेंचे नाव मागे पडले अन‌् डाॅ. नारळीकरांचे नाव महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले पाटलांनाही घ्यावे लागले. तर त्यात मसापच्या पुणेकरांनी स्वत:ने पुढे केलेल्या नावाचे जे काही काैतिक मांडले त्यानंतर ठाले पाटलांना गप्पच बसावे लागले आणि आम्ही डाॅ. नारळीकरांचे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी जाहीर करताे, असे त्यांना सांगावे लागले.

कथाकार सासणे संमेलनाध्यक्ष हाेणार असे मानले जात हाेते. सासणे हे अध्यक्ष व्हावे यासाठी घुमानच्या संमेलनापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ती माळ काही त्यांच्या गळ्यात पडत नाही. आता महामंडळाचे कार्यालय मराठवाड्यात आहे. मराठवाड्याकडून सासणे यांचे नाव पुढे करण्यात आले. मात्र, पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनी या नावाला विराेध करत डाॅ. नारळीकरांचेच नाव लावून धरले. ठालेंच्या जवळच्या पदाधिकाऱ्यालाही पुणेकरांनी आपल्या बाजूने करून घेतले.

बातम्या आणखी आहेत...