आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाज आज संमोहित आहे, एकमेकांपासून दूर जात असून विभाजित होत आहे. विवेकाचा आवज क्षीण होत आहे पण तो जिवंत ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नियोजित उदगीर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार, साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केली. मराठीबाबत न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही, मराठी भाषा ही अभिजातच आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी बाेलताना दिली.
उदगीर येथे होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सासणे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सासणे बोलत होते. साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांच्या हस्ते सासणे यांचा सत्कार करण्यात आला.
सासणे म्हणाले, ‘सध्याचा काळ संमिश्र आहे, सर्वसामान्यांचे जगणे गूढ आहे. जीवन एकरेषीय नसून व्यामिश्र आहे. लेखकाने या अनुषंगाने बोलले पाहिजे. बोललो तर काय होईल, नाही बोललो तर काय होईल असा विचार लेखकाने न करता सत्याला वाचा फोडली पाहिजे. सासणे म्हणाले, अध्यक्ष सर्वांपर्यंत पोहोचत नाही. जाणारा-येणारा, हिंडणारा असा मी अध्यक्ष आहे. समाजाची सांस्कृतिक भूक, गरज ओळखून काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. साहित्य संमेलनात इतर विषय चर्चिले जातात पण संमेलनाच्या व्यासपीठावरून साहित्यविषयक विचारच प्रकट व्हावेत ही अपेक्षा अध्यक्षपदाच्या मर्यादेत राहून पूर्ण करण्याचे आश्वासनही सासणे यांनी दिले.
सासणे यांच्या लिखाणात अद्भुततेचा मेळ : बोकील
प्रा. जोशी म्हणाले, संमेलनाध्यक्ष चालता-बोलता असावा या साहित्य महामंडळाच्या भूमिकेशी मी सहमत नाही. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी भारत सासणे यांच्या साहित्यविश्वाचा आढावा घेतला. सामाजिक, मानसिक आणि अद्भुततेचा मेळ सासणे यांच्या लिखाणात प्रकर्षाने दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक प्रकाश पायगुडे यांनी केले. तर आभार सुनीताराजे पवार यांनी मानले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.