आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:मसाप सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ; निवडणूक आणि मुदतवाढीचा मुद्दा गाजला

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीला पुढील पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा मुद्दा वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी चांगलाच गाजला. या वेळी सभासदांमध्ये वादावादी झाली आणि काही काळ गोंधळाचे चित्र निर्माण झाले. मात्र यानंतर याबाबत समिती गठित करण्यात येणार असून, या समितीच्या अहवालानंतरच पुढील दोन वर्षांत कार्यकारिणीच्या निवडणुकांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी एस.एम.जोशी सभागृहात रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार यांसह पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. या सभेत विद्यमान कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याच्या मुद्द्याबाबत झालेल्या चर्चेवेळी मते व्यक्त करताना सभासदच एकमेकांना भिडल्याची घटना झाली. विद्यमान कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याबाबत सभेत आवाजी मतदान घेण्यात आले. सदस्यांनी बहुमताने कार्यकारिणीला मुदतवाढ देण्यास पाठिंबा दिला.

... तर मी अध्यक्ष नसेन
निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करावी. या समितीने दर ६ महिन्यांनंतर विद्यमान कार्यकारिणीला अहवाल द्यावा. २ वर्षांपर्यंत जर परिस्थिती पूर्वपदावर आली अन् समितीने निवडणुका घेण्याचा अहवाल दिल्यास कार्यकारिणीने निवडणूक घ्यावी. ही माझी नैतिक भूमिका आहे. याप्रमाणे निवडणुका न घेतल्यास, मी अध्यक्ष राहणार नाही. रावसाहेब कसबे

सभासदांत वादावादी
या सभेस उपस्थित सभासदांनी मुदतवाढीच्या समर्थनार्थ आणि विरोधात मते मांडली. या वेळी सभागृहात उपस्थित असणाऱ्या सभासदांनी एकमेकांच्या मतांबाबत आक्षेप घेतला. या वेळी हे वाद हमरीतुमरीवरदेखील आले. दरम्यान, या वेळी काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला. सभेच्या उत्तरार्धातदेखील मतमतांतरे होऊन गदारोळ निर्माण झाला.

बातम्या आणखी आहेत...