आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाईन सेक्सटॉर्शन:मास्टरमाईंड अखेर जेरबंद, पुणे पोलिसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या

पुणे | प्रतिनिधी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रसह देशभर ऑनलाईन सेक्सट्रॉर्शन करून खंडणी मागण्याचा प्रकार सध्या वाढलेला आहे. पुण्यात याच प्रकारातून एका तरुणाने आत्महत्या केली होती. राजस्थान मधुन ही यंत्रणा चालवणाऱ्या मास्टरमाईंड आरोपीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

अन्वर सुबान खान (वय २९), असे आरोपीचे नाव आहे. तो राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलिस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

गावकऱ्यांचा पोलिसांना विरोध

विशेष म्हणजे आरोपीला ताब्यात घेत असताना आरोपीच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी पोलिसांना विरोध केला. पोलिसांवर दगडफेक करुन आरोपीस पळवून लावले. मात्र, पोलिसांनी अडीच किलोमीटर पाठलाग करून, जीवाची पर्व न करता आरोपीस ताब्यात घेतले.

नेमका प्रकार काय?

दत्तवाडी पोलिस ठाणे येथे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर 'हॅलो' म्हणून मॅसेज आला व लगेच एक फोटो आला. तो फोटो फिर्यादी यांनी ओपन करून पाहिला असता त्यामध्ये त्यांच्या १९ वर्षीय लहान भावाचा अर्धनग्न फोटो दिसला होता. तो व्हिडीओचा स्क्रिनशॉट होता. तक्रारदाराने हा फोटो पाहिल्यानंतर पाठवणाऱ्यांनी तो लगेच डिलीट केला.

त्यानंतर फिर्यादी यांच्या भावाच्या मैत्रीणीचा तक्रारदार यांना फोन आला. तिने सांगितले की, तक्रारदार यांचा भाऊ यास कोणीतरी इन्स्टाग्रामवरून न्युड व्हिडीओ कॉल करून, ब्लॅकमेल करून पैसे मागितले. त्याने साडेचार हजार रूपये दिले असून व्यक्ती अजून पैशांची मागणी करीत असल्याने त्यांचा भाऊ खुप रडत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्या भावास फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे फिर्यादी यास शंका आल्याने तो धावत नोकरीच्या ठिकाणावरुन घरी आला. तोपर्यंत त्यांच्या भावाने राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला गेला होता.

सेक्सटॉर्शनचे अख्ख्या गावालाच प्रशिक्षण

पोलिसांनी आरोपीस अटक केल्यावर त्याची चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या राजस्थानमधील गुरूगोठडी गावात मुले व महिलांना ऑनलाईन सेक्सटॉर्शनचे प्रशिक्षण दिले जाते. ते मग नागरिकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागतात.

ही कारवाई ही अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलिस उपआयुक्त सोहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलिस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अक्षय सरवदे, पोलीस अंमलदार काशिनाथ कोळेकर, जगदिश खेडकर, अनुप पंडित, सुर्या जाधव यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...