आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘माउली माउली...’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करून गणरायाला वंदन केले. या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत आरोग्यसंपन्न भारताकरिता श्री गणेश आणि माउलीचरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात महिला आणि मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.
कर्नाटकाच्या बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. या वेळी ट्रस्टचे सुनील रासणे, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसेंसह ऊर्जितसिंह शितोळे, महादजीराजे शितोळे, पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर, राजाभाऊ थोरात, मारुती महाराज कोकाटे, बाळासाहेब वांजळे, योगेश गोंधळे यांच्यासह वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. शितोळे सरकार म्हणाले, ‘माउलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व वारीला जात असतात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरून गणरायाचे दर्शन होत असे. कोरोना महामारीच्या संकटापूर्वी सलग दोन वर्षे अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.