आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:'मेट्रो’मुळे पुणे शहराला आधुनिक ओळख मिळणार : अजित पवार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“मेट्रो’ मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले. पुणे मेट्रोने उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद‌्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. दरम्यान,या कार्यक्रमावेळी स्थानिक नेत्यांसह मोठ्या संख्येने राजकीय मंडळींची उपस्थिती पहायला मिळाली.

सकाळी कार्यक्रम घेण्याचे रहस्य पवारांनी उलगडले
उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी सकाळी कार्यक्रम का घेतात, हा प्रश्न पुणेकरांना नेहमीच पडतो. त्याचे गूढ अजित पवार यांनी पुणे मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदील देताना शुक्रवारी सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उलगडले. ते म्हणाले, सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळी सातच्या सुमारास आम्ही कार्यक्रम घेण्याचे नियोजन करत असतो. मागील एका कार्यक्रमात पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली. त्या वेळी आयोजकांवर गुन्हे दाखल झाले. आजही तशीच स्थिती नको, यासाठी हा कार्यक्रम सकाळी घेतला आहे, असे ते या वेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...