आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआराेग्य विभागाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ गटांची भरती परीक्षा आणि म्हाडाच्या चार प्रवर्गांतील परीक्षांचे पेपर फोडण्यासाठी कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे हळूहळू पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. ‘म्हाडा’ परीक्षेच्या पेपरसाठी ३० ते ५० लाख तर आराेग्य विभागाच्या गट ‘क’ पदाकरिता ११ लाख रुपये तर ‘ड’ गटासाठी आठ लाख रुपये आकारण्याचे निश्चित झाले हाेते, अशी धक्कादायक माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
राज्यभरातील सुमारे १०० लोकांशी सौदा झाल्याचा संशय असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभाग असो वा म्हाडा किंवा इतर शासकीय परीक्षांमधील पेपर फोडणारे सर्व भामट्यांचे एकमेकांशी लागेबांधे आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह विदर्भातील बुलडाणा आणि खान्देशातील धुळे जिल्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. दरम्यान, आराेग्य भरती घोटाळ्यातील लातूरचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (५०) याने त्यास घोटाळ्यात मिळालेल्या ३० लाखांपैकी साडेतीन लाख रुपये खर्च केले असून उर्वरित सुमारे साडे सव्वीस लाखांची रक्कम घेऊन त्याचे तीन नातेवाईक पसार झाले आहेत. आता पोलिस त्यांचा शाेध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आैरंगाबाद येथून अटक करण्यात आलेले क्लासचालक अजय नंदू चव्हाण, कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संताेष चनखाेरे या तिघांची गैरव्यवहारातील भूमिका स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करून पाेलिसांनी शिवाजीनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता तिघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस काेठडी सुनावण्यात आली. या तिघांच्या ताब्यातून पाेलिसांना आराेग्य भरती परीक्षेतील विद्यार्थ्यांचे हाॅलतिकीट, ४७ परीक्षार्थींची यादी, उमेदवारांंनी सह्या केलेले काेरे धनादेश, मूळ शैक्षणिक कागदपत्रे याच्यासह डिजिटल पुरावे हाती लागले आहेत. त्यांचा आराेग्य भरती परीक्षा व म्हाडा परीक्षेतील घोटाळ्यात सहभाग असल्याचे पाेलिसांना निष्पन्न झाले आहे.
आरोग्य पेपर फुटीत नौदलाचा खलाशी
मुंबईतील नौदलाच्या डाॅकयार्ड येथे खलाशी म्हणून काम करत असलेला प्रकाश मिसाळ (वय-४०, रा.वराळे, पुणे) हा बीड येथील जिल्हा परिषदेचा प्राथमिक शाळेतील शिक्षक आराेपी उद्धव नागरगाेजे याचा नातेवाईक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील ग्रामीण रुग्णालयातील क्लार्क राजेंद्र सानप याच्याकडून आराेग्य विभाग गट ड चा पेपर मिळवून ताे पिंपरी-चिंचवड येथील त्याचे एजंट बुढे, जायभाय यांना मिसाळमार्फत दिला. तसेच मिसाळ हा या एजंटसाेबतच टीईटी, पोलिस भरती परीक्षेतील परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवणाऱ्यांशी संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
म्हाडा पेपर फोडणाऱ्या देशमुखचे २८ डिसेंबरला लग्न
जी.ए. सॉफ्टवेअर या मूळच्या बंगळुरूच्या कंपनीला म्हाडा परीक्षेच्या पेपरची जबाबदारी मिळाल्यानंतर भाेपाळ येथून विशेष सुरक्षेत पेपर छापून मुंबईत आणला गेला. परंतु देशमुख हा झटपट पैसे मिळवण्याकरिता पेपर फाेडून एजंटमार्फत त्याची विक्री करताना पोलिसांच्या हाती लागला. येत्या २८ डिसेंबर राेजी त्याचे लग्नही हाेणार हाेते.
डॉक्टरकी सोडून देशमुखचे भलतेच उद्योग
म्हाडा परीक्षेच्या पेपरमध्ये जीए साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी कंपनीचा संचालक डाॅ.प्रीतीश देशमुख (वय-३२, रा.पिंपरी-चिंचवड, पुणे) याला पकडण्यात आले आहे. देशमुख हा वर्धा येथील मूळ रहिवासी असून त्याचे एमबीबीएसपर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु डाॅक्टरकी न करता ताे मंत्रालयात लायझनिंगचे काम करण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांत फेऱ्या मारत होता.
बाेटलेच्या बँक खाते, लाॅकरची पोलिस करणार तपासणी
आराेग्य विभागाचा सहसंचालक महेश बाेटले (५३) याच्याकडे सन २०२० पासून सहसंचालकपदाचा दर्जा असून जानेवारी-फेबुवारी २०२१ मध्ये आराेग्य विभागाची गट ‘क’ परीक्षेत ताे पेपर सेटिंग समितीचा सदस्य हाेता. या परीक्षेपूर्वी पेपर मिळवण्यासाठी त्यास प्रशांत बडगिरे याने माेठी रक्कम दिल्याचा पाेलिसांना संशय असून बाेटले याच्या बँक खात्याची व लाॅकरची तपासणी केली जाणार आहे.
बीडचा कारंडे, उस्मानाबादच्या मोहितेची कोठडी वाढवली
आरोग्य विभाग घोटाळ्याप्रकरणी बाेटले याच्यासह प्रकाश मिसाळ, नामदेव कारंडे (बीड), उमेश माेहिते (उस्मानाबाद) या आराेपींची कोठडी संपली असता त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. बाेटले हा व्हाइट काॅलर गुन्हेगार असून ताेच गुन्ह्यातील मास्टरमाइंड असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. त्यानंतर त्यांची पोलिस काेठडी १८ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.