आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द:पेनड्राइव्हमध्ये प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा संचालक निघाला होता पेपर फोडायला

पुणे / मंगेश फल्लेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींना पुणे न्यायालयात घेऊन जाताना पोलिस. - Divya Marathi
आरोपींना पुणे न्यायालयात घेऊन जाताना पोलिस.
  • आरोग्यपाठोपाठ ‘म्हाडा’च्या पेपरफुटीचे रॅकेट उद्ध्वस्त

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने शनिवारी रात्री महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) परीक्षेचा पेपरफुटीचे रॅकेट उद्ध्वस्त केले. यामुळे ऐनवेळी मध्यरात्री दोन वाजता पेपर रद्द करण्याची नामुष्की गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आली. राज्यभरातील उमेदवार परीक्षा सेंटरच्या शहरात पोहोचले असताना ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागल्याने आघाडी सरकारची पुरती नाचक्की झाली आहे.

आरोग्य भरती, पोलिस भरती आणि एमपीएससी परीक्षा असा एकामागोमाग परीक्षांमध्ये घोळ,गडबड होत असल्याने तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. म्हाडा परीक्षा आयोजन व पेपर सेटिंगची जबाबदारी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीस देण्यात आली होती. या कंपनीचा संचालक डॉ.प्रीतीश देशमुख पेनड्राइव्हमध्ये पेपर घेऊन दोन साथीदारांना देणार होता. त्याच वेळी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. मुख्य आरोपी देशमुखसह या पेपरफुटीमागे बुलडाणा जिल्ह्यातील एक व औरंगाबादच्या एका आरोपींचा समावेश असून औरंगाबाद शहरातील काही खासगी क्लासचालकांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे.

आरोग्य भरती क व ड परीक्षांच्या पेपरफुटीचा तपास करताना पुणे पोलिसांना ‘म्हाडा’ परीक्षेचे पेपर फुटणार असल्याची टिप मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश दिलीपराव देशमुख (३२, रा. खराळवाडी, पिंपरी, पुणे), अंकुश रामभाऊ हरकळ (४४, किनगावराजा, ता. सिंदखेडराजा, बुलडाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (४२ , एमआयडीसी, चिकलठाणा, औरंगाबाद) या तिघांना अटक करण्यात आली. आरोग्य भरतीच्या पेपरफुटीमध्ये अटक केलेल्या अजय नंदू चव्हाण, कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे (सर्व रा. औरंगाबाद) यांचाही ‘म्हाडा’ पेपरफुटीत सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाला आहे.

आरोपींना १८ पर्यंत कोठडी
याप्रकरणी पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन संपतराव माने (४७, रा. पिंपरी-चिंचवड) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील आरोपी डॉ. देशमुख यांच्या संपर्कात कसे आले, त्यांनी पेपरफुटीचा कट कसा रचला तसेच परीक्षेच्या वेळी आरोपीकडे असलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवण्याचे ठरले होते, यासह गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पद्माकर जोंधळे यांनी ती मान्य करून आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे व अ‍ॅड. हृषीकेश सुभेदार यांनी बाजू मांडली.

परीक्षार्थींचे कोरे धनादेशही सापडले
चव्हाण, जाधव आणि त्यांचा साथीदार चनखोरे यांच्या ताब्यातून म्हाडा परीक्षेसाठी बसणाऱ्या तीन परीक्षार्थींची प्रवेशपत्रे सापडली आहेत. त्यांची मूळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश व आरोग्य विभागाच्या क वर्गासाठी बसलेल्या १६ आणि ड वर्गासाठी बसलेल्या ३५ परीक्षार्थींच्या नावांची यादी तसेच प्रवेशपत्राच्या प्रती सापडल्या आहेत.

जी. ए. सॉफ्टवेअरनेच घेतली होती पुणे पोलिस भरतीची लेखी परीक्षा
पुणे पोलिस आयुक्तालयातील २१४ रिक्त पदांसाठी सन २०१९ ची पोलिस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा ५ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. पोलिस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी व नंतर मैदानी परीक्षा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पहिल्यांदाच खासगी यंत्रणेमार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या डॉ. प्रीतीश देशमुखच्या जी. ए. सॉफ्टवेअर या कंपनीनेच घेतली होती.

यांनी केली कामगिरी
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी ही कारवाई केली.

सहा महिन्यांपूर्वी सैन्यभरतीनंतर आरेाग्य भरती आणि आता म्हाडातील पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. म्हाडातील भरतीसाठी परीक्षार्थींकडून आर्थिक व्यवहार झाला असल्यास, त्यांना आमिष दाखवले गेले असल्यास अशा विद्यार्थ्यांनी समोर यावे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही. - अमिताभ गुप्ता, पो.आयुक्त, पुणे.

आरोग्य तपासावेळी मिळाली टिप
म्हाडाच्या विविध १४ संवर्गांतील अ, ब, क गटाच्या विविध सात विभागांच्या परीक्षा रविवारी (१२ डिसेंबर) घेण्यात येणार होत्या. म्हाडाचे लेखी परीक्षा निवडीचे काम डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या जी.ए. सॉफ्टवेअर या कंपनीला देण्यात आले होते. तसा करारही कंपनीबरोबर करण्यात आला होता. परंतु पुणे पोलिसांना म्हाडाचे पेपर फोडणाऱ्या रॅकेटची माहिती मिळाली होती. त्यानुसार विविध पथके तयार करण्यात आली. ती पथके औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे येथे पाठवण्यात आली होती. या पथकांनी संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या हालचालींवरून त्यांच्यावर पाळत ठेवली होती.

औरंगाबादच्या क्लासचालकांचा समावेश : तपासामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पाॅइंट या संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अ‍कॅडमीचा संचालक कृष्णा जाधव आणि इतरांनी ही पेपरफुटीची योजना आखल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पुण्यात राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी म्हाडाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या परीक्षार्थींना पेपर देण्याची तयारी दाखवली होती.

विश्रांतवाडी परिसरात रात्रीचा थरार
एक पथक दोघांच्या मागावर ठाण्यातून लोणावळ्यापर्यंत व नंतर पुण्याच्या दिशेने निघाले, तर पुण्यातील पथकाने विश्रांतवाडीच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. इकडे, कंपनीचा संचालक डॉ.प्रीतीश देशमुख आपल्यासोबत लॅपटॉप आणि पेनड्राइव्ह घेऊन विश्रांतवाडी परिसरात वाट पाहत होता. लॅपटॉपमध्ये लेखी पेपर आणि एका लिफाफ्यात ठेवलेल्या पेनड्राइव्हमध्ये म्हाडा लेखी परीक्षेची प्रश्नसंचिका (पेपरसेट) होती. हे पेपरसेट देशमुख दोन्ही आरोपींना देणार होता. पेपर घेण्यासाठी संतोष आणि अंकुश आपल्या क्रेटा गाडीमध्ये पोहोचताच रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास पोलिसांनी त्यांच्यासह देशमुखच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनी कबुली दिली.

गृहनिर्माणमंत्र्यांची मखलाशी : मी तीन दिवसांपूर्वीच इशारा दिला होता...
मुंबई : ‘म्हाडा’ची (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण) परीक्षा पेपरफुटीमुळे शनिवारी मध्यरात्री रद्द करण्यात आली. खासगी संस्थांकडून परीक्षा घेण्यात येत असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. त्यामुळे यापुढे म्हाडाच परीक्षा घेणार आहे. विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात येईल. पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडताना केली.

राज्यभरात म्हाडाची परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्याने पुणे पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्याने पुणे पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले आहे. पेपर फुटण्यापूर्वीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय म्हाडाने घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. या परीक्षेत काही गैरप्रकार होणार असल्याचा संशय होता. त्यामुळेच गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा मी तीन दिवसांपूर्वी दिला होता, असे आव्हाड यांनी सांगितले.

पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : फडणवीस : ‘परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या, अशा प्रकारचा काळा कारभार राज्यात सातत्याने सुरू आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षेतही तीन-तीन वेळा परीक्षा रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याची तार मंत्रालयापर्यंत गेली. या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची ओढाताण सुरू आहे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही. यावर कडक कारवाई व्हावी. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

जानेवारीत होणार परीक्षा, आव्हाडांची मध्यरात्री २ वाजता घोषणा : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी परीक्षा नियोजित होती. मात्र विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री १.५४ वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ते म्हणाले की, “ काही अपरिहार्य कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे रविवारी होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा या जानेवारीत घेतल्या जातील. त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत सर्व विद्यार्थ्यांची मी क्षमा मागतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...