आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारती विद्यापीठाने साहित्य, संगीत, क्रीडा क्षेत्रात विस्तार करताना सामाजिकता जपली. संगीत शिक्षणाच्या सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. या अनुभवाचा शासनाला उपयोग होईल. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात संगीत विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी भारती विद्यापीठाने सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी केले. भारती विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी व सहकार राज्यमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, स्ट्रॅटजिक फोरसाइट ग्रुपचे संदीप वासलेकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, गौर गोपाल दास, आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, विजयमाला कदम आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणाऱ्या भारती विद्यापीठसारख्या संस्थांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. विद्यापीठाने वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करताना राज्यात आपला विस्तार वाढवावा आणि मराठवाड्यातही ज्ञानदानाचे कार्य सुरू करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले.
राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांनी स्वतः प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ सुरू केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी भारती विद्यापीठाने ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यापीठाने पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला. देशाला घडवणारे संस्कारक्षम नागरिक घडवण्याचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
वासलेकर म्हणाले, संशोधनातील अत्युच्च गुणवत्ता जोपासणे आणि शिक्षण क्षेत्रात जागतिक मानके प्रस्थापित करण्यासाठी क्रियाशील राहणे गरजेचे आहे. पर्यावरण क्षेत्रात जागतिक ख्यातीच्या संस्थांसोबत काम करण्याचा प्रयत्न करावा.
‘स्कूल ऑफ फिजिओथेरपी’ शाखेचे उद्घाटन
मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते भारती विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ फिजिओथेरपी’ या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना डॉ. पतंगराव कदम सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी गौर गोपाल दास म्हणाले, जीवनात प्रगती साधताना सेवा, समाधान, समाजासाठी योगदान आणि आनंदाचाही विचार तेवढाच महत्त्वाचा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.