आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरात कोयते उगारुन तोडफोड, दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या विरोधात कठोर कारवाई करुन त्यांना जरब बसवावा, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिले.
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या बालस्नेही कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर उपस्थित होते.
तरच जरब बसेल
पुणे शहराची लोकसंख्या वाढतच आहे. अनेकजण नोकरी, रोजगाराच्या शोधात शहरात येत असून त्यांची माहिती पोलिसांकडे नाही. शहरात गुन्हेगारी घटना वाढत आहेत. गुन्हेगारांना जरब बसावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यास खऱ्या अर्थाने त्यांना जरब बसेल, असे पाटील यांनी नमूद केले.
वकील, पोलिसांचे हवेत प्रयत्न
शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिस तसेच सरकारी वकिलांनी प्रयत्न करायला हवेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. गंभीर गुन्हे करणाऱ्या सराइतांना जामीन मिळता कामा नये. गुन्हा सिद्ध करुन गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
सर्व पोलिस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना
पुण्यातील 18 पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल; त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी केले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वारगेट पोलिस ठाण्यातील बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कायद्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाची सुरुवात होणार आहे. लहान बालके व महिलांवर अन्याय व अत्याचार झाल्यास ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना पोलीसांची भिती वाटू नये, त्या ठिकाणी विश्वास वाटावा, दडपण येऊ नये यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
कक्षात आपलेसे वातावरण
बालस्नेही कक्षात येणारे अत्याचारित बालक, विधीसंघर्षग्रस्त बालक बोलके व्हावे, गुन्ह्याची नोंद होईपर्यंत त्यांच्या बसण्याची, रमण्याची, खेळण्याची व्यवस्था करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कक्ष उभारण्यासाठी सामाजिक उत्तर दायित्व निधीसोबतच जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल.
कायद्याचा धाक असावा
चंद्रकांत पाटील म्हणाले, आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्याला लवकर जामीन मिळाला नाही, न्यायालयात गतीने खटले दाखल करुन चालवले आणि गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढून शिक्षा झाल्यास आरोपींच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल. त्यादृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
आमदार निधीचा हातभार
‘बालस्नेही कक्ष'आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून स्वारगेट पोलीस ठाणे अंतर्गत बालस्नेही कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस ठाणे परिसरातील रंगरंगोटी व स्वच्छता तसेच नुतनीकरण पुणे पोलिस मास निधीतून करण्यात आले आहे. कायद्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल कल्याण कल्याण पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे. बालकांचे जबाब नोंदविताना त्यांच्यावर दडपण येऊ नये यासाठी हे बालकल्याण पोलीस अधिकारी पीडित बालक, विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत संवाद साधतील तसेच त्यांना समुपदेशन करण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.