आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी नोकऱ्यांना मर्यादा:खाजगी क्षेत्रात नोकऱ्या वाढवाव्या लागतील, मंत्री चंद्रकांत पाटलांचे मत

पुणे | प्रतिनिधी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी नोकऱ्या आता मर्यादीत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात नोकऱ्या वाढतील, यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात व्यक्त केले.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात 75 हजार जणांना सरकारी नोकऱ्या देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संदर्भात पुणे विभागात एकूण 316 जणांना गुरुवारी नियुक्तीपत्रे देण्यात आली. यानिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यक्रमात आयोजित कार्यक्रमात उच्च तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.

सरकारकडून छोट्या उद्योगांना पाठबळ

चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकारी खात्यातील विविध रिक्त पदे भरावीत, नवीन पदे निर्माण करावी याबाबतची मागणी सातत्याने होते. मात्र, सरकारी नोकऱ्या निर्माण होणे आणि त्याची पूर्तता होणे यात मर्यादा आहेत. कारण संबंधित पदे भरल्यानंतर त्यांच्या पगारासाठी महसूलही तितका आवश्यक हवा आणि कर वाढविण्यास बंधने आहेत. त्याचप्रमाणे अनावश्यक माणसे प्रशासनात भरली तर अतिरिक्त इतर जण बसून राहतील. त्यामुळे खाजगी क्षेत्रात नोकऱ्यांची संख्या वाढवावी लागेल, यादृष्टीने सरकार कौशल्य विकास, छोट्या कर्जांना प्रोत्साहन, छोट्या उद्योगांना पाठबळ, अशा प्रकारच्या उपाययोजना करत आहे.

प्रशासनात चांगली लोकं हवीत

पाटील म्हणाले, लोकशाहीत लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि प्रशासन हे चार स्तंभ महत्त्वपूर्ण आहेत. कार्यक्षमतेने हे सर्व स्तंभ चालले तर आपली लोकशाही सदृढ होईल. प्रशासन नीट चालले नाही तर काहीच होऊ शकत नाही. देश, राज्य चालवण्याचा भार हा प्रशासनावर असून प्रशासनात चांगल्या प्रकारच्या लोक भरती झाली पाहिजे. या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.

तरुणांनो नोकरी देणारे व्हा

पाटील म्हणाले, यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तरुण तीन ते पाच वर्ष अथक प्रयत्न करतात. मात्र , नोकरीत रुजू झाल्यानंतर ते काहीसे आरामदायी झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे प्रशासनात किती माणसे वाढवली तरी ढीलाई दिसून येते. त्यामुळे नोकरी लागण्यासाठी ज्याप्रमाणे प्रयत्न करण्यात येतात तशाच प्रकारची मेहनत नोकरीनंतर करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिवसभर उत्तमरित्या काम करावे. सरकारी नोकऱ्यांपासून आम्ही पळ काढत नाही, मात्र सरकारी नोकरीत भरती करण्यासाठी मर्यादा असल्याने आगामी काळात छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देवून नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हावे यादृष्टीने आपणास वाटचाल करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...