आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांनी राजीनामा द्यावा:वडेट्टीवारांकडून चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल, मराठा क्रांती मोर्चाने पुण्यात केली राजीनाम्याची मागणी

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारथीेबाबत मंत्री चुकीची माहिती देताहेत : आंदोलक
  • मी ओबीसी नेता असल्याने माझ्यावर आराेप : मंत्री विजय वडेट्टीवार

सारथी संस्थेबाबत मंत्री विजय वडेट्टीवार हे चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी दुसरा सक्षम मंत्री नेमावा. तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. 

मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर, राजेंद्र कोंढरे,  रघुनाथ चित्रे, धनंजय जाधव, बाळासाहेब आमराळे, सचिन आडेकर, श्रुतिका पाडाळे, मीना जाधव यांसह पदाधिकारी उपस्थित होते. 

सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आली असताना सारथी स्वायत्त आहे, अशी चुकीची माहिती मंत्री देत आहेत. सारथीच्या कारभारात प्रत्यक्ष शासनामार्फेत स्वायतत्ता न राहता मंत्री केंद्र शासन निर्णय काढत आहेत. ११ आयएएस असलेल्या नव्या संचालक मंडळाला नामधारी ठेवले असून चालू याेजना बंद करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विद्यावेतनसाठी रखडवले असून शासन पातळीवर एकही नवीन याेजना सुरू केली नाही. सारथीचा तारादूत प्रकल्पही बंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांनी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी आंदाेलन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामार्फत प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांना सारथीतून हटवताे म्हणून घाेषणा केली. प्रत्यक्षात तसे न हाेता याउलट जे.पी. गुप्ता यांना संचालक करण्यात आले आहे.  सारथीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून चौकशी समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल दिलेला असताना दुसरी समिती नेमण्याचा घाट घातला जात आहे. वास्तविक पाहता पहिल्या समितीचा अहवाल नागरिकांसाठी खुला करण्यात यावा. या खात्याला विजय वडेट्टीवार न्याय देऊ शकत नसल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राजेंद्र कुंजीर यांनी केली. पुढे ते म्हणाले, नाेव्हेंबर २०१९ पासून आजपर्यंत सारथी प्राप्त निधी व त्यावर केलेला खर्च तसेच सारथीच्या चालू असलेल्या याेजना व नवीन प्रकल्पाची माहिती सारथीच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात यावी. मराठा आरक्षणाचा विषय सर्वाेच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मंत्री उपसमितीने त्यांच्या बैठका हाेण्यापूर्वी मराठा संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी वारंवार बैठका आयाेजित कराव्यात,  असेही त्यांनी सांगितले.

मी आेबीसी नेता असल्याने माझ्यावर आराेप : मंत्री विजय वडेट्टीवार

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाईत सरकार कमी पडणार नाही किंवा ते रद्द हाेणार नाही हीच भूमिका आमची आहे. सारथी संस्था टिकावी हाच आमचा उद्देश आहे. मी आेबीसी नेता असल्यामुळे माझ्यावर ते आरोप करत असावेत. सारथी संस्था यापुढील काळात चालावी आणि मराठा तरुणांचा उध्दार व्हावा हेच माझे मत असून काेणतीही निगेटिव्ह भूमिका मी घेतलेली नाही. मुख्यमंत्र्यांशी याबाबत मी चर्चा करणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

इतर मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा ठिय्या आंदोलन : आबासाहेब पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारपासून सुनावणी होणार आहे. न्यायालयात सुरू असलेल्या या लढाईत सरकारने आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. न्यायालयीन कक्षेतील आरक्षणाशिवाय इतर मागण्या सरकारने ताबडतोब मान्य कराव्यात व याबाबत आदेश काढावेत. यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सरकारकडे तगादा सुरू आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुन्हा परळी आंदोलन प्रमाणे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा आबासाहेब पाटील यांनी सरकारला दिला आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी नवीन वाद नको

मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणी प्रयत्न  करू नये.  छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत  एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तिवात आलेल्या संस्थेला आणि आडून मराठा समाजाला अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य नाही.  -संभाजीराजे छत्रपती, खासदार

बातम्या आणखी आहेत...