आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याचा बडगा:गुंड संदीप शेंडकर व त्याच्या टोळीविरुद्ध मोक्काची कारवाई, काही दिवसांपूर्वीच तरुणावर जीवघेणा हल्ला

पुणे | प्रतिनिधी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील सहकानगर परिसरातील सराईत गुन्हेगार संदीप शेंडकर याच्यासह त्याच्या टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त यांची मोक्कानुसार केलेली ही २१ वी कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये दहशत निर्माण होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संदीप सोमनाथ शेंडकर( वय - २३, टोळी प्रमुख), ऋषी शिवाजी भगत( वय - २९ ), सुफियान बशिर शेख (वय- १९ ), अल्ताफ सलिम शेख, (वय १९) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण बालाजीनगर, धनकवडी, पुणे /e येथील रहिवासी आहेत.

काही दिवसांपूर्वी तरुणावर धारदार शस्त्राने वार

संबंधित टोळक्याने काही दिवसांपुर्वी एका तरुणास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला होता. यावेळी सहकारनगर परिसरातील स्थानिक नागरिक फिर्यादीच्या मदतीसाठी आले असता, टोळक्याने हातातील धारदार हत्यारे उगारुन त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच धारदार हत्यारे हवेत फिरवत दुचाकीवर बसुन मोठमोठयाने आरडा ओरडा करीत सदर परिसरात दहशत निर्माण केली. टोळीप्रमुख संदीप शेंडकर याने दहशत कायम ठेवण्यासाठी आणि स्वत:च्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध सहकारनगर, भारती विद्यापीठ,कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न, गंभीर दुखापतीचे गुन्हे आत्तापर्यंत दाखल आहेत.

वेळोवेळी सूचना देऊनही वर्तवणुकीत बदल नाही

वेळोवेळी सूचना देऊनही त्यांच्या वर्तणुकीत बदल होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या गुंडांविरोधात मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव सहकारनगर पोलिसांकडून पाठविण्यात आला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि स्वारगेटचा अतिरिक्त पदभार असलेले एसीपी नारायण शिरगावकर हे करत आहेत.