आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांडुरंगापेक्षा मोदींचा फोटो मोठा:पुण्यात भाजपने लावलेल्या बॅनरमुळे वाद; राष्ट्रवादीचा आक्षेप, वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याचा आरोप

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 जून रोजी प्रथमच देहू नगरीत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू संस्थान प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. भाजपनेदेखील पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठीची जय्यत तयारी केली आहे. मात्र, भाजपकडून मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

मोदींच्या स्वागतासाठी भाजपकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो मोठा लावण्यात आला आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजपकडून लावण्यात आलेला हा फोटो विठ्ठल भक्तांचा आणि वारकरी सांप्रदायाचा अपमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विट करत या बॅनरवरती आक्षेप घेतला आहे.

रविकांत वरपे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे."

भाजपने लावलेले हे पोस्टर काढून टाकावे आणि विटेवरी उभा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी देखील वारकरी संप्रदायाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...