आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील चंदननगर परिसरात टोळीची दहशत:खंडणीखोर सराईत खान टोळीविरुद्ध मोक्का कारवाई; आरोपींवर गुन्हा दाखल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदननगरमधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून खंडणी वसूल करणार्‍या सराईत आसिफ खान याच्यासह टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीविरूद्ध दरोडा, खंडणी, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 114 वी कारवाई आहे.

आसेफ ऊर्फ आसिफ ईस्माईल खान (वय 23, टोळी प्रमुख) इरफान हसन भोला (वय 25 रा. जनता वसाहत पर्वती, मुळगाव- कर्नाटक) शहाबाज मेहमुद खान (वय 50) समीर मेहबुब शेख (वय 36) फरियाज हसनखान पठाण (वय 32 तिघेही रा. संतोषनगर कात्रज) आणि जॉन अशी मोक्कानुसार गुन्हा केलेल्यांची नावे आहेत.यातील आरोपी आसेफ ऊर्फ आसिफ ईस्माईल खान, (वय 23) वर्षे (टोळी प्रमुख) हा असुन त्याने त्याचे इतर सहा साथीदारांना वेळोवेळी बदलुन बरोबर घेवून चंदननगर पोलिस स्टेशन तसेच करमाड, औरंगाबाद ग्रामीण या पोलीस स्टेशन हददीत त्यांची बेकायदेशीर कृत्ये चालु ठेवुन दरोडा व खंडणी मागणे अशाप्रकारे टोळीचे सदस्यास अवैध मार्गाने आर्थिक लाभ व इतर फायदा करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार संघटितपणे करीत आहेत.

त्याबाबत त्यांचेवर वेळोवेळी योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. तसेच आरोपी विरुध्द चंदननगर पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि कलम 386, 384, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत आसिफ खान कोंढव्यातील राहणारा असून त्याने साथीदारांसह चंदननगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. खराडीतील आय.टी. पार्कमधील कंपनीच्या मालकास धमकावुन खंडणी उकळली. बेकायदेशिर कृत्याप्रकरणी त्यांच्यावर पुणे, औरंगाबाद ग्रामीण हद्दीत गुन्हे दाखल आहेत.

टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यावतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांना सादर केला. गुन्ह्याचा तपास एसीपी किशोर जाधव करीत आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, एपीआय मनोहर सोनवणे, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, राजेश नवले, रामचंद्र गुरव, नाना पतुरे, सागर तारु, अनुप सांगळे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...