आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे.
मी सुन्न झालो
उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जुना झाला, हे वाक्य राज्यपालांच्या तोंडून ऐकून मी सुन्न झालो. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीन गडकरीही होते, त्यांनी महापुरुषांच्या अपमानाबाबत आपल्या भाषणात भूमिका मांडणे आवश्यक होते.
राज्यपालांना तसेच शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे वक्तव्य करणाऱ्या सुधांशू त्रिवेदीला पदावरून हटवावे, या मागणीसाठी उदयनराजेंनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिले आहे. याबाबत आज पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
लाज वाटत नाही
उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जुने झाले असतील तर देशाने आणि राज्याने कोणाला पाहून प्रगती केली. भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांना महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना लाज वाटत नाही. सर्वधर्म समभाव, स्वराज्य संकल्पना, समानतेची वागणूक असे विचार शिवाजी महाराज यांनी मांडली. अशाप्रकारे चुकीची विधाने कोणी करत असेल तर आमच्या सारख्या शिव भक्तांना चीड निर्माण होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन विचार आणि आदर्श कोण हे जनतेला स्पष्ट करून सांगावे. त्यांचा पंतप्रधान यांनी राजीनामा घ्यावा. यापुढे अशाप्रकारे कोणी वक्तव्य केले तर त्यांना आम्ही नेस्तनाबूत करू, असा इशारा उदयनराजेंनी यावेळी दिला.
अन्यथा देशाचे तुकडे
उदयनराजे म्हणाले, सर्वधर्म समभाव आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी यांचे विचार दिशादर्शक आहे. अन्यथा देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. सर्वसामान्य लोकांचा स्वराज्यात सहभाग असावा ही संकल्पना शिवाजी महाराज यांची होती. त्यांनी कधी स्वतःचे राज्य केले नाही तर रयतेचे राज्य संकल्पना राबवली. मात्र, आज समाजाचा विचार कमी झाला असून व्यक्ती केंद्रित विचार वाढले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तिस्थान
उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणी अपमान करत असेल किंवा त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. देशांत अनेक राजे मुघल साम्राज्यासमोर शरण केले. पण, छत्रपती शिवाजी महाराज हे कधी शरण गेले नाही. लोकांचे अन्याय दूर करण्यासाठी आणि चांगले साम्राज्य देण्यासाठी त्यांनी आयुष्भर प्रयत्न केले. देशातील सर्वसामान्य लोकांना गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रयत्न केले. आधुनिक भारत संकल्पना त्यांनी मांडली. अनेक जणांचे ते आदर्श स्फूर्तिस्थान ठरले आहेत.
अन्यथा आपण गुलामगिरीत असतो
उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार केवळ मोठे पुतळे उभे करून होणार नाही. तर त्यांच्या विचारांची अंमलबजावणी दैनंदिन जीवनात झाली पाहिजे. देव कोणी पहिला नाही मात्र, शिवाजी महाराज हे देवा सारखे होते. त्यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे लज्जास्पद आहे. लोकशाहीत मोकळा श्वास हा आपण महाराज यांच्या काळात ज्यांनी योगदान दिले त्यामुळे घेत आहोत. अन्यथा आपण गुलामगिरीत अजून अडकलो असतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.