आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोई ते निघोजे रस्त्याने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या डोक्यात मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेली. त्यानंतर हा प्रकार अपघाताचा वाटावा यासाठी महिलेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत टाकून दिले. महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
नातवाची फिर्याद
शिवाजी निवृत्ती लाखनगिरे (वय 45, रा. मोशी. मूळ रा. मानखेड, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तानाबाई बबन येळवंडे (वय 85) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा नातू सचिन रामनाथ येळवंडे यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.
खून करून भासवला अपघात
पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून रोजी पहाटे साडेतीन वाजता तानाबाई येळवंडे या मोई ते निघोजे रस्त्याने पायी चालत मॉर्निंग वॉक करत होत्या. निघोजे बाजूकडे जाऊन पुन्हा मोईला येत असताना त्यांच्या मागून पायी चालत आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तानाबाई यांच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना रस्त्याच्या दुस-या बाजूला असलेल्या चारीमध्ये टाकून देऊन अपघात झाल्याचा भासविण्याचा प्रयत्न केला.
समोर आला सीसीटीव्ही
तानाबाई यांना मोशी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. 3 जून रोजी सकाळी दहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा नातू सचिन येळवंडे यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली.
तांत्रिक पुराव्यांची जुळवाजुळव
महाळुंगे चौकीचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग यांच्या निदर्शनाखाली तीन पथके तयार केली. या पथकांनी परिस्थितीजन्य पुराव्यांसह तांत्रिक पुरावे गोळा करण्यात सुरुवात केली.
तपासले 33 सीसीटीव्ही फुटेज
पोलिसांनी परिसरातील 33 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. घटनेच्या दिवशी परिसरात उशिरापर्यंत जागे असलेले, रात्री कामावर जाणा-या कामगारांकडे कसून तपस केला आणि 24 तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलिस अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, किशोर सांगळे, संतोष काळे, अमोल निघोट, प्रशांत वहिल, शिवाजी लोखंडे, शरद खैरे, बाळकृष्ण पाटोळे यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.