आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकाचा निर्घृण खून:वाढदिवस साजरा करताना हटकल्याने टोळक्याचा राग अनावर; पुण्यातील बावधन येथील घटना

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवसाची पार्टी साजरी करत असताना शांत राहण्यास सांगितल्याच्या रागातून टोळक्याने ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. बावधन येथील गंगा लिजेंट सोसायटीच्या लेबर कॅम्पमध्ये रविवारी ही घटना घडली.

पितबसा कमलचंद जानी (वय 57) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत जानी यांचा मुलगा उपेंद्र पितबसा जानी (वय 17, रा. गंगा लिजेंट सोसायटी, बावधन) यांनी या प्रकरणी सोमवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे उर्फ कळवा, आकाश पवार उर्फ चेल्या व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे शनिवारी लेबर कॅम्प येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. त्या वेळी फिर्यादीचे वडील आणि आणखी तीन ते चार लोकांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. याचा राग आल्याने नितेश शेलार याने कॅम्पमधील चंदन याला मारहाण केली. त्यानंतर कॅम्पमधील इतर लोकांनी नितेश शेलार याला तू चंदन याला का मारले, असा जाब विचारत मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर शेलार आणि त्याचे मित्र हे लेबर कॅम्पमधील लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगणमताने फिर्यादी यांचे वडील पितबसा कमलचंद जानी (वय ५७) यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांना खून केला.

दरम्यान, याच्या परस्पर विरोधी तक्रार नितेश शेलार याने केली आहे. या तक्रारीनुसार, फिर्यादी शेलार हे आपला मित्र ऋतिक याचा वाढिदवस असल्याने त्याच्या तोंडाला केक लावण्यासाठी त्याच्या मागे पळत लेबर कॅम्पमध्ये गेले. त्या वेळी फिर्यादी यास चोर समजून तीन जण समोर आले. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या कपाळावर लाकडी दांडक्याने मारले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फर्यादी यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.