आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासाची चक्रे:मुसेवाला हत्या प्रकरणात आरोपी संतोष जाधवला झोपेतच उचलले, हल्ल्याच्या भीतीने पोलिसांचा सलग 20-22 तास प्रवास

मंगेश फल्ले | पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित हल्लेखाेर संताेष जाधवला कच्छ-भूज परिसरातील एका पडक्या घरातून तो झाेपेत असताना जेरबंद केले. पथकावर गँगस्टरचा हल्ला होण्याच्या भीतीने पोलिस पथकाने गुजरात ते पुणे यादरम्यान कुठेही न थांबता सलग २० ते २२ तास प्रवास करत पुणे गाठले. विशेष म्हणजे, पुणे ग्रामीणचे पाेलिस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख व एलसीबीचे पाे. नि. अशाेक शेळके रात्रभर जागरण करत गुजरातमधील पाेलिस पथकाच्या संपर्कात होते. संताेष जाधव हा पुणे जिल्ह्यातील मंचरचा रहिवासी असून लहानपणापासून त्याला गुंडगिरीचे आकर्षण आहे. सन २०१९ मध्ये १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला पळवून नेल्याप्रकरणी त्याच्यावर मंचर ठाण्यात बलात्कार, अपहरण व पाेस्‍को कलमानुसार गुन्हा दाखल हाेता. नंतर त्याने पीडितेसोबतच लग्न केले. मात्र, यादरम्यान ताे फरार असताना गुजरातेत पसार झाला हाेता. त्या वेळी त्याची मूळचा सातारचा आणि गुजरातमधील मांडवी भागातील पेंटर नवनाथ सूर्यवंशीच्या संपर्कात हाेता. सोशल मीडियाच्या माध्यमातून ताे साैरभ महाकालसह लाॅरेन्स बिश्नोई टाेळीच्या संपर्कात आला हाेता. मंचर येथे आेंकार बाणखेले याचा खून केल्यानंतर फरार काळात त्याने बिश्नोई टाेळीकरिता राजस्थानमधील गंगानगर येथे एका व्यावसायिकाच्या घरावर व त्याच्या पत्नीच्या हाॅस्पिटलबाहेर गाेळीबार केला होता. या वेळी राजस्थान व दिल्लीत त्याची सर्व व्यवस्था बिश्नोई टाेळीने केली. सूर्यवंशी हा त्याला आश्रय देत हाेता. महाकालच्या चौकशीत सापडला जाधवचा पत्ता : पाेलिसांनी साैरभ महाकालला अटक केल्यानंतर त्याच्याकडे संताेषची चौकशी सुरू केली. चौकशीत नवनाथ सूर्यवंशीचे नाव समोर आले. त्यानुसार सपाेनि नेताजी गंधारे, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले हे पाेलिस कर्मचाऱ्यांचे पथक गुजरातला जाधवच्या शाेधासाठी रवाना झाले. तपासात बिश्नोई टाेळीकडून जाधव याची पाठराखण केली जात असल्याचे दिसले. त्यामुळे जाधवसह पथकावर हल्ल्याची भीती असल्याने त्यांनी खबरदारी बाळगत सुरुवातीला नवनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने एका पडक्या घरात जाधव पेहराव बदलून लपल्याचे व त्यास आपणच दरराेज जेवण पुरवत असल्याचे सांगितले. जाधव झाेपेत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले. जाधवच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे पुणे जिल्ह्यातील चार ते पाच जण बिश्नोई टाेळीच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली असून त्याची खातरजमा पाेलिस करत आहेत.

महांकाळ थेट गँगस्टर विक्रम ब्रारच्या संपर्कात
विक्रम ब्रार आणि गाेल्डी ब्रार म्हणून नामांकित गँगस्टर आहेत. ते कॅनडात आहेत. महांकाळ हा विक्रम ब्रारच्या संपर्कात होता आणि विक्रम ब्रार हा बिश्नोई गँगच्या संपर्कात होता. संतोष जाधवही बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. महांकाळ हा संतोषसोबत पंजाबला गेला होता. महांकाळचा विक्रम ब्रारशी संतोष जाधवमार्फत संपर्क झाला होता. महांकाळ पंजाबसह हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत गेला होता. महांकाळ याने बिश्नोई गँगचे टार्गेट हेरण्यासाठी पंजाब आणि हरियाणात रेकी केली होती. तशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...