आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवचा साथीदार सौरभ उर्फ सिद्धेश उर्फ महाकाल हिरामण कांबळे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना सौरभ महाकाल पोलिसांच्या जाळ्यात अडकला गेला आहे. पंजाबी गायक सिधू मुसेवाला खून प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष हल्ल्याशी संबंध नसला तरी त्याने खूना पूर्वी रेकी केल्याचा संशय तपास यत्रणांना असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
मंचर येथील सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याच्या ऑगस्ट 2021 मधील खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधवला आश्रय दिल्याप्रकरणी सौरभ कांबळेला अटक करण्यात आली असून, विशेष मकोका न्यायालयाने त्याला 20 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पंजाब पोलिसांचे पथक पुण्यात दाखल
सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात संतोष जाधव हा हल्लेखोरांपैकी एक असल्याचा संशय पंजाब पोलिसांना आहे, त्यादृष्टीने जाधव यांच्या संपर्कात असलेला आणि त्याच्या सोबत राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागात फिरणारा सौरभ महाकाल पंजाब पोलिसांच्या रडारवर आला आहे. पुणे पोलिसांच्या तपासात सौरभ महाकाल संतोष जाधव यांच्या संपर्कात असल्याची माहिती निष्पन्न झाल्याचे पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. पंजाब पोलिसांचे एक पथक पुण्यात महाकाल याच्या गुन्ह्याच्या तपासातील माहिती घेण्यासाठी दाखल झाले आहे. त्याच प्रमाणे दिल्ली पोलिसांचा तपास यंत्रणाचे पथकही पुण्यात लवकरच दाखल होत आहे.
सौरभ महाकाळ मूळचा पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील उत्तरमळा या गावचा रहिवासी असून त्याचे वडील रिक्षाचालक आहे तर आईचे यापूर्वीच निधन झालेले आहे. संतोष जाधव याच्यासोबत तो ठिकठिकाणी फिरत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यापूर्वी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिस रेकॉर्डवर आढळून आलेले आहे अशी माहिती पुणे ग्रामीण एलसीबी पथकाचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली आहे.
सलमान खान प्रकरणी करणार चौकशी
अभिनेता सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत मुंबई पोलिस पथक महाकाल याचाकडे चौकशी करणार आहे. तर पंजाब पोलिसांना मुसेवाला खून प्रकरणात महाकाल याने खुना पूर्वी रेकी केल्याचा संशय असून त्याबाबत तपास करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांचे पथक पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत दाखल झाले असून तेही मूसेवाला प्रकरणासंदर्भात आणि राजस्थान मधील विष्णू लॉरेन्स गॅंग या अनुषंगाने आरोपीकडे चौकशी करत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांना आरोपीची 13 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून या दरम्यान आरोपीस राजस्थान पंजाब आणि हरियाणा या विविध भागात तपासा करता घेऊन जायचे आहे आणि त्याच्याकडे मूसेवाला प्रकरणाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करावयाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.