आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीप्स..:अभिनय शिकविला जाऊ शकत नाही, आतून यावा लागतो; तो सतत अंध:कारात टाळ्या शोधतो, यातून स्वतःला सावरा - नाना पाटेकर

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''अभिनय शिकविला जाऊ शकत नाही तर तो आतून यावा लागतो. पुस्तकांपेक्षा रोज भेटणार्‍या लोकांना वाचायला शिका. जीवनात आलेले अनुभव व्यक्तीला उत्कृष्ठ अभिनय शिकवू शकतो. परंतू अभिनय हा सतत अंध:कारात टाळ्या शोधत असतो. त्यामुळे यातून स्वतःला सावरा असे मत अभिनेता पद्मश्री नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल' चे उद्घाटन

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे येत्या शैक्षणिक वर्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ' दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल' चे उद्घाटन अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, संजय कामटेकर, प्र कुलगुरू डॉ. तपन पांडा, कुलसचिव गणेश पोकळे, प्रसिद्ध क्रिएटीव्ह डायरेक्टर अभिजित पानसे, धिरज सिंंग व दूरदर्शनचे माजी संचालक मुकेश शर्मा उपस्थित होते.

कलाकार होणे म्हणजे आयुष्यभर दु:खी राहणारा

नाना पाटेकर म्हणाले, कलाकार होणे म्हणजे आयुष्यभर दु:खी राहणारा. कारण रोजच्या अभिनयात सुख व दु:ख उधार घ्यावे लागते. यामध्ये आपण स्वतः बरोबरच कुटुंबालाही विसरत जातो. पुढे सर्व गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हा हातातून सर्व काही निसटलेले असते. रोजच्या जीवनात सुख दु:खाची व्याख्या बदलली तरच सुखी रहाल. कठिण परिश्रमाच्या आजू बाजूला यश असते. जीवनात काहीच कठिण नाही त्यासाठी फक्त विचार सकारात्मक ठेवा.

संघर्षाशिवाय यश नाही - पानसे

अभिजित पानसे म्हणाले, संघर्षाशिवाय कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत नाही. परंतू भारतीय चित्रपटांवर आजही हॉलिवूडचा खूप मोठा प्रभाव दिसतो. बॉलिवूडवर पडलेली विदेशी छाप पुसावयाची आहे. त्यासाठी योग्य फिल्म स्कूलची आवश्यकता आज पूर्ण झाली आहे. येथील प्रॅक्टिकल हे मातृभाषेत असणार आहे. तसेच १० टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देऊन मोफत शिक्षण दिले जाईल. येथे प्रथम सेमिस्टर पासून विद्यार्थ्यांना प्रोफेशनल स्टेज वर शिकायला मिळाणार आहे.

फिल्म इंडस्ट्रीत मोठी स्पर्धा - डॉ. आर. एम. चिटणीस

डॉ. आर. एम. चिटणीस म्हणाले, सध्याच्या काळात फिल्म इंडस्ट्रीत खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे यात टिकण्यासाठी योग्य शिक्षणाची गरज आहे. या इंडस्ट्रीमध्ये आपला जम बसविण्यासाठी कौशल्य, समर्पण, कठिण परिश्रम, पेशन्स आणि स्वतःचे काही तत्व गरजेचे आहे. ज्या आधारे प्रगती करू शकाल.