आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिसागर:देहूनगरीत मध्यान्हसमयी नांदुर्कीचा वृक्ष सळसळला.. दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी घेतले दर्शन

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन मध्यान्हसमयी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नांदुर्कीच्या वृक्षाची पाने सळसळली आणि त्या क्षणी जगद्गुरू तुकाराम महाराज बीजसोहळा साकार झाला. लाखो हात श्रद्धेने जोडले गेले. “जय जय रामकृष्ण हरी’ असा घोष झाला आणि श्रीक्षेत्र देहूनगरीत संत तुकाराम महाराज बीजसोहळ्याचा अनुभव २ लाख भाविकांनी घेतला.

श्रीक्षेत्र देहूनगरीत गुरुवारी संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा बीजसोहळा लक्षावधी भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. गुरुवारी पहाटे ३ वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. पहाटे ४ वाजता देवस्थानचे प्रमुख विश्वस्त, अध्यक्ष, वंशज आणि मानकरी यांच्या उपस्थितीत मुख्य देऊळवाड्यात महापूजा झाली. त्यानंतर शिळा मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि वैकुंठगमन स्थान येथेही महापूजा बांधण्यात आल्या. सकाळी ६ ते १० या वेळेत भाविकांसाठी दर्शनबारी सुरू करण्यात आली.

सकाळी १०.३० वाजता तुकोबांच्या पालखीचे मुख्य देऊळवाड्यातून वैकुंठगमन स्थानाकडे प्रस्थान झाले. पालखीच्या दर्शनासाठी या वेळी भाविकांची झुंबड उडाली. दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुर्कीच्या वृक्षाची पाने सळसळली आणि लक्ष कंठांतून ‘जय जय रामकृष्ण हरी’ असा घोष झाला. त्या क्षणीच बीजसोहळा साकार झाला.

पोलिसांचा कडक बंदोबस्त; प्रशासनाचे अचूक नियोजन देहूनगरीत बीजसोहळा अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांचे दर्शन सुरळीत पार पडावे यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तसेच बाॅबशोधक पथक, श्वानपथक मदतीसाठी सज्ज होते.

बातम्या आणखी आहेत...