आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या नव्या भारताची संकल्पना मांडली जात आहे पण या नव्या भाराताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असूच शकणार नाहीत तर नव्या भारताचे प्रणेते नथुराम गोडसे असतील, अशी भीती महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केली. देशात सध्या घृणेचे राजकारण सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो'चा नारा दिला त्या प्रमाणे ‘घृणा सोडा' असा नारा दिला जाण्याची आज गरज आहे, नाही तर भारतीय पुन्हा एकदा गुलाम बनतील असे त्यांनी उद्वीग्नपणे नमूद केले.
जैन धर्माचे अभ्यासक स्व. सुखलालजी फौजमलजी खाबिया यांच्या स्मरणार्थ श्री जैन सामुदायिक उत्सव समिती व श्री सकल जैन संघ, पुणेच्या वतीने गांधी यांना पहिल्या ‘जिन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. विजय तेंडुलकर सभागृहात आयोजित सोहळ्यात पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी संत साहित्य अभ्यासक सदानंद मोरे होते. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्यासह अचल जैन, विजयकांत कोठारी, मिलिंद फडे, लक्ष्मीकांत खाबिया, अभय छाजेड, आमदार रवींद्र धंगेकार व्यासपीठावर उपस्थित होते.
गांधीवादी विचारांचे दुकान मांडून बसलेल्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांना बदनाम केले आहे असे सांगून तुषार गांधी म्हणाले, गांधी विचारांच्या प्रचार प्रसाराचे कार्य माझ्याकडून पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही. महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांविषयी दररोज नवनवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आज कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यावे लागेल याविषयी दडपण असते. मराठी भाषेत गांधीवध असा शब्दप्रयोग केला जातो या शब्द प्रयोगाला आक्षेप व्यक्त करून ते म्हणाले, हत्या आणि वध यामध्ये फरक आहे. वध राक्षसाचा केला जातो तर हत्या सामान्य व्यक्तीची केली जाते, हे जाणून घेऊन हा शब्दप्रयोग टाळावा.
बापूंवर महावीरांच्या विचारांचा पगडा होता कारण त्या विचारांमध्ये सर्वधर्मातील विचारांचा स्वीकार आहे. बापूंनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला, संशोधन केले आणि त्यातील घेण्यायोग्य गोष्टी आत्मसात केल्या. भूतकाळात अनेक महनीय व्यक्तिंनी मोठे कार्य केले आहे. आता वर्तमानाची चिंता करणे आवश्यक आहे, कारण भविष्यात युवा पिढीला आपण काय विचार, आदर्श देणार आहोत हे वर्तमानातील कृतींवरून ठरणार आहे. बापूंनी सांगितलेल्या अहिंसेचा पूर्ण अर्थ समजून मग ती आचरणात आणणे गरजेचे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. परम अहिंसा हे तत्त्व पुन्हा आचारणात आणणे ही काळाची गरज असल्याचे गांधी म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.