आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी चित्रपटांची संख्या भरमसाठ वाढत आहे. परंतू वितरणाची योग्य यंत्रणा आपल्याकडे विकसित नाही, अशी खंत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक अमोल गोळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सुमी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा उपक्रमांतर्गत सुमी चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गोळे, बाल कलाकार पुरस्कारप्राप्त आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गोळे म्हणाले, अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपटांना प्रेक्षक नाकारतात, ही वस्तुस्थिती आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे आहेत. मात्र, या बळावर चित्रपट हीट होऊ शकत नाही. चित्रपटाची कथा ही दर्जेदार असेल तर प्रेक्षक नक्कीच त्याला प्रतिसाद देतात. एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिला आठवडा त्या चित्रपटाचे भविष्य ठरवत असतो. पहिल्या आठवडयात प्रेक्षकांकडून चित्रपटाची प्रसिद्धी होते. चित्रपट हिट होण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. मात्र, कथा दर्जेदार असेल तर तो चित्रपट हमखास चालतो.
राष्ट्रीय पुरस्कार सुखद धक्का
राष्ट्रीय पुरस्काराबाबत गोळे म्हणाले, राष्ट्रीय पुरस्कार हा सुखद धक्का होता. विषयामुळे पुरस्काराची थोडी अपेक्षा होती. नशीबवान, रंगा-पतंगा, पावनखिंडच्या यशानंतर चांगला विषय मांडता आला. सुमीची कथा परिक्षकांना आवडली. सुमीच्या प्रवासाबद्दल गोळे म्हणाले, सुमीची मुळ कथा ही संजीव झा यांची आहे. एका शालेय मुलीचा शिक्षणासाठीचा संघर्ष पडदयावर उभा केला आहे. आजही तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर झालेल्या नाहीत. त्यांना पुरेशा सोयीसुविधा मिळत नाही, हेच या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. विषय आवाक्यात असल्याचे पाहून हा चित्रपट मराठीत करायचे ठरवले. लॉकडाऊन अगोदर हा चित्रपट पुर्ण झाला. उत्तम कथानक हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. तसेच दोन्ही बालकलाकारांचा उत्तम अभिनय ही सुद्धा या चित्रपटाची जमेची बाजू आहे. कास्टिंगसाठी ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यामुळे आकांक्षा आणि दिव्येश सारखे गुणी कलाकार या चित्रपटाला लाभले.
दिव्येशचा पुरस्कार विशेष स्वरूपाचा
गोळे यांनी सांगितले की, बालकलाकार म्हणून दिव्येशची निवड करताना समजले, की तो कर्णबधिर असून यंत्राच्या मदतीने त्याला ऐकायला येते. मग यंत्राच्या मदतीने त्याने चित्रिकरण पुर्ण करत उत्तम अभिनय सादर केला. दिव्येशमधील अंगभुत कौशल्याने आम्ही सर्वच भारावून गेलो. त्यामुळे अजय देवगणला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा दिव्येशला मिळालेला पुरस्कार मी मोठा मानतो, असे गोळे यांनी सांगितले. दिव्येशचे आई-वडिल मुकबधिर आहेत. दिव्येशला यंत्र नसेल तर ऐकू येत नाही. साडेतीन लाखांचे यंत्र कानात घालून तो काम करत होता, असेही गोळे यांनी सांगितले.
चित्रिकरणावेळी घाबरले - बालकलाकार पिंगळे
बालकलाकार आकांशा पिंगळे म्हणाली, चित्रपटासाठी ऑडिशन मग निवड यानंतर सुरुवातीला थोडीशी अस्वस्थ होते. चित्रीकरणावेळी बऱ्याचदा घाबरले. रडू देखील आले. परंतु, अमोल सरांनी वेळप्रसंगी दरडावून आमच्याकडून चांगला अभिनय करून घेतला. जेव्हा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला. सर्व नातेवाईक, शाळेतील शिक्षकांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता. पप्पांना वाटायचे मी अभिनय क्षेत्रात करिअर करावे. त्यांचे स्वप्न पुर्ण केले.
याप्रसंगी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, सरचिटणीस पांडूरंग सरोदे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.