आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:भारती विद्यापीठात 'रोगप्रतिकारक शक्ती आणि जैविक परीक्षण राष्ट्रीय केंद्र'सुरू  होणार, 3 सप्टेंबरला उद्घाटन

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाची इर्षा ही संशोधन संस्था आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात रोगप्रतिकारक शक्ती आणि जैविक परीक्षण राष्ट्रीय केंद्र भारती विद्यापीठाच्या धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात सुरू होणार आहे. या केंद्रासाठी 'इनोव्हेशन इंडिया'या कार्यक्रमांतर्गत भारती विद्यापीठाच्या इर्षा या संशोधन संस्थेला १६ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडे चार वाजता भारत सरकारच्या बायो टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव डॉ. रेणू स्वरूप यांच्या हस्ते होणार आहे.

कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, बायरॅकच्या व्यवस्थापकीय संचालिका अनुजा भल्ला, एन. बी. एम. च्या मिशन डायरेक्टर डॉ. कविता सिंग, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, इर्षाचे संचालक डॉ. ए. सी. मिश्रा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

डॉ. कदम म्हणाले, या केंद्राच्या माध्यमातून लस आणि औषध निर्मितीसाठीच्या प्रक्रियेत देशासाठी मोठे योगदान देण्याची संधी भारती विद्यापीठ विश्व विद्यालयाला आणि इर्षाला मिळाली आहे. दहा हजार चौरस फूट जागेतले हे केंद्र केवळ एका वर्षात सर्व सुविधांसह सुसज्ज करण्यात आले आहे.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, हे केंद्र रोगप्रतिकारक लस आणि औषधे निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्या तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या संशोधन संस्थांबरोबर काम करेल. विषाणूरोधी औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल.

इर्षाचे संचालक डॉ. मिश्रा म्हणाले, ‘रोगप्रतिकारक लस निर्मिती तसेच जैविक परीक्षणाच्या कामात हे केंद्र महत्वाची भूमिका बजावणार आहे. यापूर्वी आपल्या देशाला या कामासाठी परदेशात असणाऱ्या अशा केंद्रांवर अवलंबून रहावे लागत होते. त्यासाठी वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणावर लागत होता. या केंद्राच्या निर्मितीमुळे ही उणीव दूर होईल. करोना विरुद्धच्या लढाईत असे केंद्र वरदान ठरेल. दर महिन्याला चार हजार पी आर एन टी चाचण्या करण्याची या केंद्राची क्षमता आहे. या चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक आणि अत्युच्च दर्जाच्या जीव सुरक्षा सुविधांची उपलब्धता हे या केंद्राचे वैशिष्ट्य आहे. लस आणि औषध निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांना आणि संस्थांना इर्षा मदत करीत असून इंटरनॅशनल व्हॅक्सींन इन्स्टिट्यूट ,साऊथ कोरिया यांच्या समवेत चिकन गुनिया वरील लशी संदर्भात काम करण्यासाठी सहयोग करार झाला आहे.