आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प'वॉर':शरद पवारांनी नातवाला फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही, लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा पवार म्हणाले होते...

पुणे ( प्रदीप गुरव )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मावळ लोकसभा उमेदवारीवरून पार्थ पवारांना फटकारले होते

राज्यातील राजकारणात पवार कुटुंब सध्या केंद्रस्थानी आलं आहे. पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील वादावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अभिनेता सुशांत आत्महत्या तपास प्रकरणी पार्थ पवार यांच्या वक्तव्याला शरद पवारांनी काडीमात्र किंमत दिली नाही. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पवारांनी नातवाला सावरण्याऐवजी फटकारले आहे. पण नातवाला फटकारण्याची ही पहिली वेळ नाही. त्याचे मूळं लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवारांची मावळ मधील उमेदवारीपर्यंत जाते.

पार्थ पवारांना आजोबांनी सुरुवातीलाच दिले होते पराभवाचे संकेत...
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेसवर घराणेशाहीचे आरोप झाल्यावर तिकिटवाटपाची सुत्र खुद्द मोठ्या पवारांनी हातात घेतली. त्यावेळी खुद्द पवारांचा नकार डावलून पार्थ यांनी मावळात लोकसभा उमेदवारीचे घोडे दामटले. अन् शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या कडून लाखभर मताने पराभूत झाले. त्यापूर्वी पत्रकारांनी घराणेशाहीवरून छेडल्यावर पार्थ यांच्या पराभवाची भविष्यवाणी शरद पवारांनी " ठेचा लागल्यावर पावले आपोआप सरळ पडतील" अशा सूचक शब्दात पार्थ यांच्या उमेदवारीवरून मत व्यक्त केली. अन् निवडणुकीत पार्थ पवारांच्या हट्टाचा पराभव झाला. पराभव न पाहिलेल्या पवार घराण्यातील व्यक्तीचा हा पहिलाच पराभव ठरला.

अजित पवारांची ही नस्ती उठाठेव मोठ्या पवारांना रूचली नाही
राजकीय जीवनाचा फारसा अनुभव गाठीशी नसताना थेट मावळ लोकसभा मतदार संघात पवारांचा पराभव झाला. पुणे जिल्ह्यात सरकार नोकरदार मावळात बदली झाल्यावर शिक्षा समजतात. पण अजित पवारांनी संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मावळात धाडली. पण यश आले नाही. अजित पवारांची ही नस्ती उठाठेव मोठ्या पवारांना रूचली नाही. पवारांना पराभव समोर दिसत असावा, तरी पार्थ यांनी खासदार बनण्याचा हट्ट सोडला नाही.

रोहित पवारांच्या राजकीय महत्वकाक्षेचे लाड पुरवणारे आजोबा...
सहसा कोणते ही आजोबा आपल्या नातवावर रागावून बोलत नाही. आई-बापापेक्षा ही आजी आजोबाच नातवाचे अधिक लाड पुरवतात. नातवाचे अनेक अपराध आजी आजोबा पोटात घालतात. मात्र आमदार रोहित पवारांच्या राजकीय महत्वकांक्षेचे लाड पुरवणारे आजोबा शरद पवार आपल्या दुसऱ्या नातवाला सतत फटकारत आले आहेत. रोहित पवार पुणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा तीन वर्षाच्या अनुभवातून कर्जत जामखेडचे आमदार बनले. मात्र पार्थ यांचा थेट खासदार बनण्याचा प्रयत्न आजोबाचे न ऐकल्याने फसला. तर अजित पवारांचा भाजपाशी केलेला घरोबा देशात आश्चर्यकारक ठरला. त्यामुळे अखंड पवार घराण्यात महत्वकाक्षेपायी मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा
‘नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे,’ अशा तिखट शब्दांत बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानटोचणी केल्यामुळे पार्थचे पिता व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी मंत्रालयात जाऊन त्यांना भेटल्या होत्या. माध्यमांसमोर बोलताना सर्व काही आलबेल असल्याचा प्रयत्न केला जात असला. तरीही पवार कुटुंबात या प्रकरणामुळे मतभेद नक्कीच निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...