आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • NCP Governor Koshyari's Ban On Agitation, Savarkar Learned That Freedom Hero; Statement Of Pune NCP City President Prashant Jagtap

लहानपणापासून सावरकर हे स्वातंत्रवीर हेच शिकलो:सावरकर महाराष्ट्राचे सुपुत्र-राष्ट्रपुरुष; पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण शिगेला पोहचले. शिवसेनेने गांधी यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सावरकर यांच्याबाबत विरोधाची भूमिका मवाळ झाल्याचे सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावरकर पुतळा येथील आंदोलनात दिसून आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि राष्ट्रपुरुष होते. त्यांच्या बाबतचा इतिहास दोन वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला जातो. ते राष्ट्रपुरुष होते की राष्ट्रद्रोही हा चर्चेचा विषय असला तरी आम्ही लहानपणापासून सावरकर हे स्वातंत्रवीर म्हणूनच शिकलो आहे, अशी पाठराखण राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात सावरकर पुतळा सारसबाग येथे सोमवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना यांबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र व महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तीमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत.

ही अतिशय गंभीर व संतापजनक बाब आहे.छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत आहेत. यातून त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा ते राबवित आहे. किंबहुना ते महाराष्ट्र भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत आहेत.राज्यपाल महाराष्ट्राचा वारंवार अपमान करीत आहेत व त्याला भाजप प्रोत्साहन देत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपतींनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागीतली होते असे नीच व अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली.

सत्तेसाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचे तळवे चाटण्याची ही अतिशय लाचार प्रवृत्ती असून कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांचा निषेध करीत आहे.शिवरायांचा अवमान ही भाजपची मॅच फिक्सिंग असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला.‌

सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे ,प्रिया गदादे , किशोर कांबळे , वनराज आंदेकर , महेश शिंदे ,बाबा पटील , मुणालीनी वाणी, श्वेता होनराव , पार्थ मिठकरी , गणेश मोहीते, मनाली भिलारे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...