आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्त्रीचे गर्भाशय आणि त्याच्याशी संबंधित विविध प्रकारचे शोषण ही वस्तुस्थिती आहे. शासनाची धोरणे चांगली असली तरी त्यांच्या अंमलबजावणीसाठी अनेक वर्षे लागतात. शासनाचे विविध विभाग आणि समाज यांच्यामधील मोठ्या अंतराचीही यात भर पडते. आयुक्तांपासून मंत्र्यापर्यंत सगळे बदलत असताना सरकारची संस्थात्मक स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी कूस ही कादंबरी उपयुक्त आहे असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
उचित माध्यम प्रस्तुत सर्जनशील कट्ट्याच्या वतीने ज्ञानेश्वर जाधवर लिखित कूस कादंबरीवर आयोजित ‘कूस : स्त्रीच्या जगण्याचा व आरोग्याचा कथात्मक शोध’ परिसंवादाचे आयोजन केले होते. साहित्यिक आसाराम लोमटे, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेवती राणे, वंचित विकासच्या संचालिका मीना कुर्लेकर, केशायुर्वेदचे डॉ. हरीश पाटणकर, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर, कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर, उचित माध्यमचे जीवराज चोले, शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ही कादंबरी समाजाच्या तळागाळातील समूहाच्या दुःखमय अनुभवांची ज्वलंत कहाणी असून, लेखकाने अनुभवांचे ताकदीने चित्रण केले आहे. प्रमुख पात्र असलेली सुरेखा ही निघून जाते, असा कादंबरीचा शेवट आहे. ही सुरेखा कुठेही निघून गेली नाही, तर ती स्त्रियांच्या चळवळीतच येईल यात शंका नाही. पण ही सुरेखा समाजात कुठेकुठे आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान आहे.
डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, फड, पिशवी आणि काजळी या त्रिदलाशी संबंधित ही कादंबरी आहे. बहूपीडित्वाचा परखड शोध या कादंबरीत घेतला गेला आहे. कादंबरीतील तपशीलांची शैली, लेखकाची आंतरिक गोवणूक, जगण्याचे आवाज, जिवंत माहोल या कलाकृतीच्या आशयात भर घालतात. समाज या समस्येकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, याचे चित्रण ही कादंबरी करते.
डॉ. रेवती राणे म्हणाल्या, गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनांकडे गांभीर्याने पाहायला हवे, हा विचार देणारी ही कादंबरी आहे. गर्भपिशवी प्रत्यारोपणाचे प्रयोग यशस्वी होत आहेत. अशा वेळी गर्भपिशवी वाचवण्यालाही महत्व द्यावे. ‘बेटी बचाव’ प्रमाणे आता ‘थैली बचाव’ अशी घोषणा द्यायची वेळ आली आहे.ही एका स्त्रीची प्रातिनिधिक कहाणी आहे. यात निरक्षरता, अनारोग्य, कुपोषण, लैंगिक शिक्षणाचा अभाव, स्त्री-पुरूष असमानता, व्यसनाधीनता, हुंडा, अज्ञान, अंधश्रद्धा याविषयी लेखकाने अत्यंत धाडसाने आणि निर्भीडपणे लेखकाने लिहिले आहे. स्त्रियांना माणूसपणाची जाणीव करून देण्यासाठी आपण काम केले पाहिजे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.