आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचोरी, दरोडा, लुटमार अशा पारंपारिक गुन्हेगारीचे स्वरूप बदलून काही काळापासून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. ऑनलाइन स्वरुपात नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा सायबर चोरटे घालत असून त्यास आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. दरवेळेस फसवणुकीचे नवीन ऑनलाईन तंत्र चोरटे अवलंबताना दिसत आहेत. गुगल रिव्ह्यू टास्क आणि लाईक्सच्या बहाण्याने पैसे मिळवून देतो असे सांगत, सायबर चोरट्यांनी नवा फंडा अवलंबल्याचे आता दिसून येऊ लागले आहे. पार्ट टाइम जॉब मिळवून देतो व त्याद्वारे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने सुरुवातीला सायबर चोरटे टेलिग्राम खात्याच्या माध्यमातून गुंतवणूकदारांशी संपर्क साधतात.समाजमाध्यमावर प्रसारित होणाऱ्या जाहीराती तसेच ध्वनीचित्रफितीला दर्शक पसंती (लाइक्स) दिल्यास त्यात अल्पावधीत मोठा नफा मिळेल असे सांगण्यात येते. प्रत्येक दर्शक पसंतीला ५० ते १५० रुपया पर्यंत पैसे देण्याचे आमिष दाखवले जाते. त्याकरीता गुंतवणूकदाराचे बँक खात्याची गोपनीय माहिती घेण्यात येते. त्यानंतर ‘प्री -पेड टॅक्स ‘नावाची योजना सांगून व्हिडिओ लाईक्सला १० ते १५ टक्के परतावा आरोपींकडून गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात दिला जातो.त्यामुळे विश्वास संपादन झाल्यावर आणखी नफा मिळवण्याचे आमिष दाखवले जाते. ‘इलाईट ग्रुप ‘ ही नवी योजना सांगून त्यात ३ ते ५ जणांचा मर्यादित ग्रुप तयार केला जातो. यामध्ये लाखो रुपयांचे पॅकेज भरले तर, त्यावर १५ ते २० टक्के नफा दिला जाईल असे सांगण्यात येते. नुकतेच पुण्यात एका ६४ वर्षीय भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या सुभेदाराने या आमिषाला बळी पडून टास्क पूर्ण करण्याच्या तसेच टॅक्स व अपग्रेडेशन करून त्याद्वारे जास्त मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपींच्या भूलथापांना बळी पडून १ कोटी दहा लाख ४४ हजार रुपये गमावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर अशाचप्रकारे आणखी दोन प्रकरणे पुणे सायबर पथकाकडे आली असून त्यात एकामध्ये ३५ लाख रुपये तर दुसऱ्या केस मध्ये ४० लाख रुपये गुंतवणूकदाराने गमावले आहेत.
तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा पुणे सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले की, ऑनलाइन जॉब,टास्क ,साखळी पद्धती मार्केटिंग यामध्ये फायदा मिळेल, अशा आमिषांना बळी पडू नका. फसवणुकीत पैसे गेल्याचे लक्षात आल्यास, सदर पैसे पुन्हा मिळवण्यासाठी आणखी पैशांचा भरणा करण्याची चूक करू नका. कोणतीही भीती न बाळगता तात्काळ आर्थिक व्यवहार थांबवून पोलिसांकडे तक्रार दाखल करा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.