आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद भेट:नवीन वर्षात पुणेकरांची मेट्राेतून सफर, सांस्कृतिक राजधानी टाकते आहे कात, आधुनिकीकरणाची कास

पुणे (मंगेश फल्ले)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेत ५ किमीचा भुयारी मार्ग आहे.

वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे शहरात महत्त्वाकांक्षी मेट्राे प्रकल्पाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू असून नवीन वर्षात मेट्राेचे दाेन टप्पे सुरू हाेण्याच्या मार्गावर अाहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून मेट्राेतून सफर करण्याची उत्सुकता पुणेकरांना असून त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी हाेऊन वाहतुकीची काेंडी कमी हाेण्यासाेबतच प्रदूषणात घट हाेऊ शकेल.

पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेत ५ किमीचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग कृषी महाविद्यालय येथून सुरू होऊन स्वारगेटपर्यंत जाणार आहे. भूमिगत मेट्राेकरिता बाेगदा निर्मितीच्या कामाकरिता कृषी महाविद्यालयातून निघालेले टनेल बोअरिंग मशीन हे दहा महिन्यांच्या कालावधीनंतर १६३० मीटरच्या दाेन बाेगद्यांचे काम पूर्ण करून सिव्हिल कोर्ट येथील स्थानकासाठी खोदलेल्या खड्ड्यात दाखल झाले आहे. जमिनीखाली २८ मीटर खाेलीवर हा टनेल ब्रेकथ्रूचा हा एेतिहासिक टप्पा पार करण्यात अाला अाहे. या मार्गांमध्ये शिवाजीनगर बसस्थानक, सिव्हिल कोर्ट, फडके हौद, मंडई व स्वारगेट ही पाच स्थानके असतील. भुयारी मार्गाचे काम लवकर होण्यासाठी स्थानकांच्या ठिकाणी मोठा खड्डा करून खालून बांधकाम करण्यात येते व भुयारी मार्गाचे काम टनेल बोअरिंग मशीनच्या साहाय्याने करण्यात येते. जेव्हा टनेल बोअरिंग मशीन भुयारी स्थानकासाठी खोदलेल्या खड्ड्यात दाखल होते. त्यास टनेल ब्रेकथ्रू म्हणतात. या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने पुणे मेट्रोच्या भुयारी कामातला महत्त्वाचा मैलाचा दगड पार पाडला आहे. अशा प्रकारे एनएटीएम बोगद्यात टनेल ब्रेकथ्रू ही भारतातील निवडक घटनांपैकी एक आहे. टनेल बोअरिंग मशीनच्या ६.४ मीटरच्या अजस्र कटर हेडने जमिनीखालील कठीण दगड फोडून एनएटीएमने (न्यू अाॅस्ट्रियन टनेलिंग मेथड) बोगदा निर्माण करण्यात येत अाहे. या टनेल ब्रेकथ्रू मशीनचे नाव मुठा असून त्याच्या सोबतीने मुठा टीबीएम मशीन लवकरच सिव्हिल कोर्टमध्ये ब्रेकथ्रू साधणार आहे. बुधवार पेठ स्थानकाच्या दिशेने उत्खनन सुरू करण्यासाठी टीबीएम्सला एकत्रित केले जात अाहे. अाता पुढील बाेगदा मुठा नदीखालून स्वारगेटपर्यंत साकारण्यात येणार अाहे. सिव्हिल काेर्ट ते रामवाडी मार्गासाठी बंडगार्डनजवळील नदीत खांबावर सेगमेंट बसवण्यासही सुरुवात करण्यात अाली आहे.

११४२० कोटींच्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला लॉकडाऊननंतर गती...

  • पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर ते फुगेवाडी अाणि पुणे शहरातील काेथरूड परिसरातील वनाज ते डेक्कनजवळील गरवारे महाविद्यालय यादरम्यान प्रत्येकी पाच किलाेमीटर अंतराची मेट्राे सेवा कार्यान्वित हाेईल.
  • या कामाकरिता सुमारे पाच हजारपेक्षा अधिक कामगार काम करत असून लाॅकडाऊनदरम्यान मेट्राेचे ७० ते ८० टक्के कामगार त्यांच्या मूळ गावी परतल्याने चार ते पाच महिने मेट्राेचे काम मंदावले हाेते.
  • परंतु कामगार पुन्हा कामावर परतू लागल्याने टाळेबंदीदरम्यान रखडलेल्या पुणे मेट्राेच्या कामाने वेग धरला अाहे. पिंपरी ते स्वारगेट या मेट्राे मार्गावरील संत तुकारामनगर या मेट्राे स्थानकाचे काम ८० टक्के पूर्ण झाले अाहे.
  • या मेट्राे मार्गाचे सुमारे साडेसहा किलाेमीटर अंतराचे काम पूर्णत्वास गेलेले अाहे. भाेसरी, कासारवाडी, दापाेडी, बाेपाेडी या स्थानकांचे काम ५० टक्के पूर्ण झाले अाहे.
  • संत तुकारामनगर स्थानकाचे काम सात महिने अाधी सुरू झाले हाेते. परंतु टाळेबंदी व नंतर कामगार कमी असल्याने हे काम सात महिने थांबले हाेते. इतर स्थानकांचे काम पूर्ण हाेण्यास अाणखी पाच ते सहा महिने कालावधी लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...