आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण:बातमी हाेण्याइतपत दिल्लीत काहीच घडलेले नाही, अजित दादाही नाराज नाहीत

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात विराेधी पक्षनेते अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा हाेती. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, काल सर्वच जण भाषणे करणार हाेते, परंतु भाषणे लांबली. मीसुद्धा माझ्या सात मिनिटांपेक्षा अधिक बाेलले. त्यामुळे कार्यक्रमास उशीर झाला हाेता. काही लाेकांची विमाने, रेल्वेची वेळ झालेली हाेती. त्यामुळे अजित पवार, सुनील तटकरे, वंदना चव्हाण असे पाच ते सहा जण बाेलले नाहीत. जयंत पाटील यांनीही थाेडक्यात भाषण आटाेपले. त्यानंतर थेट साहेबांना भाषण करू दे, म्हणजे वेळेत कार्यक्रम संपेल, अशी चर्चा झाली. मात्र, इतके काही बातमी हाेण्याइतपत इंटरेस्टिंग घडलेले नाही, असे स्पष्टीकरण खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

भाजपचे लाेक संपूर्ण राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने फिरतात, याचा मला आनंद आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले हाेते की, ‘एक देश, एक पक्ष’ म्हणजेच हे वक्तव्य घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या विराेधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही हे संविधानानुसार चालणारे लाेक आहोत. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की, ‘एक देश आणि अनेक पक्ष’ कारण संविधानानुसार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तशा प्रकारे लिहून ठेवले आहे. नड्डा हे वरिष्ठ नेते असून त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. आम्ही आमच्या मतदारसंघात जे विराेधक येतील त्यांचेही स्वागतच करताे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

अर्थमंत्री बारामती दौऱ्यावर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण तीन दिवसांच्या बारामती लाेकसभा दाैऱ्यावर पक्षबांधणीकरिता येत आहेत. याबाबत सुळे म्हणाल्या, सीतारमण यांनी काेणतीही संस्था, जागा आपल्याला पाहावयाची असेल तर लाेकप्रतिनिधी म्हणून त्यांना मदत करून माहिती देईन. सिंहगड किल्ला परिसरात झालेल्या सुधारणा, पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या अंजिरास मिळालेली ओळख, बारामतीचा विकास, इंदापूर मधील पर्यटन, दाैंड परिसरातील साखर कारखाने अशाच प्रकारे भाेर, वेल्हा, मुळशीत परिस्थिती असून अनेक गाेष्टी पाहण्यासारख्या आहेत. बारामती मतदारसंघ एक माॅडेल म्हणून पाहिले जाते. अर्थमंत्री सीतारमण यांना इतकी विकासकामे पाहण्यास तीन दिवसांचा वेळ कमी पडेल, असेही खा. सुळे म्हणाल्या.

खड्डे बुजवण्याची चांगली संकल्पना

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दाखवा, तीन दिवसांत आम्ही ते भरू, असे आश्वासन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. याबाबत सुळे म्हणाल्या, गडकरी यांनी चांगल्या हेतूने ही कल्पना मांडली असून त्याबाबतची माहिती संसदेतही दिली आहे. पुणे शहर व परिसरातील महामार्गावरील ज्या अडचणी आहेत त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...