आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत:राष्ट्रवादी, भाजपचे प्रत्येकी 3, काॅंग्रेस नेत्याच्या एका कारखान्याला साखर आयुक्तालयाची नोटीस

मंगेश फल्ले | पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या हंगामात ७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या राज्यातील सात साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने नोटीस बजावली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, नगरचे भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचा समावेश आहे. ७ पैकी तीन कारखाने राष्ट्रवादीच्या तर ३ कारखाने भाजप नेत्यांचे असून एक कारखाना काँग्रेस नेत्याचा आहे. राज्यातील उसाचा गळीत हंगाम १५ जून राेजी संपलेला असून विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे. जागतिक पातळीवरही ब्राझीलला मागे टाकत भारत साखर व ऊस उत्पादनात अग्रेसर झाला असून त्यात राज्याचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी मिळावी याकरिता विशेष पाठपुरावा केल्याने आतापर्यंत ९७ टक्के एफआरपीचे वाटप झाले आहे. उर्वरित ठिकाणी साखर कारखाने व शेतकरी यांच्यात एफआरपीचे पैसे दिवाळीपर्यंत देण्याबाबत करार झाले आहेत.

जे कारखाने एफआरफी देत नाहीत त्यांच्यावर महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. ७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या सात साखर कारखान्यांना नाेटीस बजावण्यात आलेली आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आरसीसीनुसार नाेटिसा बजावल्या अाहेत. ७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण १४५०३.५९ लाख आरसीसी रक्कम थकवली आहे. यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आल्याचे दिसून येते.

नाेटीस बजावलेले कारखाने पुढीलप्रमाणे :
१) बीड - अंबाजाेगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजाेगाई, -आरसीसी रक्कम ८१४.१५ (संबंधित नेते- माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी )
२) साेलापूर - सहकार शिराेमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर - आरसीसी रक्कम ३६७४.९० लाख (कल्याणराव काळे , राष्ट्रवादी)
३ ) सातारा - किसनवीर ससाका भुईंज, सातारा - आरसीसी रक्कम - ४११.९१ लाख ( आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी )
४) बीड - वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी - आरसीसी रक्कम - ४६१५.७५ लाख ( माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप)
५) उस्मानाबाद - जयलक्ष्मी शुगर प्राे.नितळी - आरसीसी रक्कम - ३४०.६९ लाख (विजयकुमार दंडनाईक, भाजप)
६) नगर - साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, नगर - आरसीसी रक्कम -२०५४.५० लाख - (आ. बबनराव पाचपुते, भाजप)
७) पुणे- राजगड सहकारी साखर कारखाना लि. भाेर- आरसीसी रक्कम २५९१.६९ लाख (आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस)

बातम्या आणखी आहेत...