आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री अजित पवार हे उत्तम वक्ता म्हणून राज्यात परिचित आहेत. आपल्या खुमासदार शैलीतून ते विरोधकांना गप्प करत असतात. एवढेच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांचे चुकले तर कानही पिळत असतात. त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे ते अनेकदा अडचणीतही आले आहेत. असे असले तरी त्यांनी आपली शैली कायम ठेवली आहे. शनिवारी बारामती येथील एका कार्यक्रमात त्यांच्या खास शैलीत त्यांनी कार्यकर्त्यांचा समाचार घेतला.
जळगाव सुपे (ता. बारामती) येथे आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी जळगाव सुपेपासून काऱ्हाटी अंतर किती आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना केला. यावर उपस्थितांनी ६ ते ७ किमी अंतर आहे, असे सांगितले. हा आढावा घेत असतानाच एका कार्यकर्त्याने ‘या ठिकाणी बसगाड्यांची सोय करावी’ अशी मागणी पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी मिश्कीलपणे उत्तर देत ‘व्हय बाबा, आता मी ड्रायव्हर होतो. साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रिया तिकिटं फाडेल,’ असे म्हणताच उपस्थिांमध्ये खसखस पिकली. त्यावर पवार पुढे म्हणाले, पूर्वी येथील परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे ते म्हणाले. पवार म्हणाले, चांगल्या सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. काऱ्हाटी येथे कृषिमूल्य शिक्षण संस्था आहे. तसेच सुपे येथे विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुविधा देण्यात येणार आहेत, असे सांगताना त्यांनी अनेक विषयांवर या वेळी भाष्य केले.
इतका आळशीपणा करायचा नाही
या सोबतच कार्यकर्त्यांचे कान पिळताना पवार म्हणाले, जांभळाच्या झाडाखाली बसायचं आ करून जण जांभूळ थोबाडातच गेलं पाहिजे. खाली पडलं तर ते उचलून टाका, इतका आळशीपणा करायचा नाही. आम्ही सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो. तेव्हा तर तुम्ही झोपला होता. सुविधा मिळाल्या पाहिजेत. मात्र, सगळं एकदम होत नाही. खूप सुविधा मिळाल्या तर त्याची किंमत राहत नाही. इंदापूर, पुरंदर, दौंडची, फलटणची परिस्थिती पाहा, आपली परिस्थिती पाहा, अशा शब्दांत पवार यांनी कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे कान पिळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.