आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुक्कड साहित्य संमेलनाचे उद्घाटन:मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी सर्वसामान्यांचीही - डाॅ. सदानंद मोरे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी अनेक व्यासपीठांवर प्रश्न उपस्थित केला जातो. चर्चा होते. मराठी भाषा टिकण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. परंतु दैनंदिन व्यवहार मराठी भाषेत झाले तरच मराठी भाषा टिकेल. मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी सर्वसामान्यांचीही आहे, असे प्रतिपादन अभ्यासक, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

विवेक साहित्य मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नुक्कड साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 7 जानेवारी) डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन कुलकर्णी, विवेक समूहाचे समन्वयक महेश पोहनेरकर व्यासपीठावर होते.

सुमारे शंभर वर्षांपूर्वी इतिहासकार राजवाडे यांनी मराठी भाषा मरणाला लागली आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता याचा संदर्भ देऊन मोरे पुढे म्हणाले, कोणतीही भाषा फक्त साहित्य निर्मिती झाल्याने टिकत नाही तर भाषा जगण्याशी सुसंगत असावी लागते. पालक आपल्या मुलांना मराठी शाळेतून काढून इंग्रजी शाळेत घालतात कारण मराठी शाळा टिकेल की नाही या विषयी पालकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मराठी भाषेतून शिकल्याने रोजी - रोटीचा प्रश्न सुटणार नाही असा समजही जनसामान्यात आहे. जीवनव्यवहाराला मराठी भाषा पुरेशी नाही असे लोकांनीच ठरविले आहे. विद्यार्थी संख्येअभावी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास त्यात वावगे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कुठलीही भाषा श्रेष्ठ असली तरी टिकत नाही जेव्हा जगण्याचा व्यवहार त्या भाषेतून होत नाही या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सध्याचा काळ हा मराठी साहित्य संमेलनांचा काळ आहे. नुक्कड ते वैश्विक अशी त्याची व्याप्ती वाढते आहे, ही गोष्ट साहित्यक्षेत्राच्या दृष्टीने आश्वासक आहे. मराठी भाषा टिकण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषा संमेलने झाली पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यकृती आणि सरस्वती पूजनाने झाले. मान्यवरांचे स्वागत महेश पोहनेरकर यांनी ग्रंथभेट आणि बालचित्रकारांनी रेखाटलेली चित्रे देऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता धायरकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...