आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडूशेट गणपतीला 225 किलो बुंदीचा मोदक अर्पण:थायलंडमधील गणेश भक्तांनी गणेशमूर्ती घेऊन बाप्पांना केले अभिवादन

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या 130 व्या वर्षी प्रभात फरसाण हाऊसच्या मालाणी परिवार तर्फे 225 किलो बुंदीचा मोदक श्रीं ना अर्पण करण्यात आला. श्रीं समोर नैवेद्य दाखवून हा मोदक प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात आला.

मालाणी परिवाराचे दीपक मालाणी व निखील मालाणी यांनी हा मोदक अर्पण केला. साजूक तूप, केसर, मोतीचूर, ड्रायफ्रूट वापरुन हा मोदक साकारण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून राबविण्यात येणा-या उपक्रमाद्वारे उत्सवात परदेशी व भारताच्या विविध राज्यांतील पर्यटक दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाला भेट देत आहेत. गणेशोत्सवाचा वारसा आणि संस्कृती जगभरातील लोकांना जाणून घेता यावी आणि ही संस्कृती जगभर पोहोचावी, यासाठी पुण्यातील गणेशोत्सवात राज्याच्या पर्यटन विभागातून परदेशी व विविध राज्यांतील नागरिकांना सहभागी करुन घेतले जात आहे.

याअंतर्गत थायलंड येथील 70 गणेशभक्तांनी एकाच वेळी उत्सवमंडपात येऊन गणरायाची आरती केली. थायलंड येथून आणलेल्या गणेशमूर्ती समोर ठेऊन त्यांनी आरती केली. आम्ही दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्याकरिता येतो. मागील दोन वर्षे कोविड संकटामुळे येता आले नाही. मात्र, यावर्षी निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने आम्हालाही दर्शनाचा आनंद घेता आला, अशी भावना या थायलंडच्या भक्तांनी व्यक्त केली.

दरम्यान मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते रायगड चे खासदार माजी मंत्री सुनील तटकरे यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

गेली 35 वर्षे मी या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतो.संबंध महाराष्ट्राला सुख शांती भरभराट आणि शेतकऱ्याच्या कष्टाला जे महाराष्ट्रात सामर्थ्य मिळते त्या बळीराजाला सुगीचे दिवस पुढच्या काळात येवो ,राज्याची सुख शांती अश्याच पद्धतीने रहावी अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली .

थायलंडचे गणेशभक्त दगडूशेट हलवाई गणपतीच्या चरणी.
थायलंडचे गणेशभक्त दगडूशेट हलवाई गणपतीच्या चरणी.

यावेळी त्यांच्या सोबत कुटुंबातील सदस्य आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाकडू यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...