आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:ओला कॅबचालकाकडून प्रवासी महिलेसोबत अश्लील चाळे; हडपसर पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतुकीसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एका ओला कॅब चालकाने प्रवासी म्हणून गाडीत बसलेल्या एका महिलेची छेड काढून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोषी कॅबचालकाच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यासंदर्भात एका पीडित महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी ओला कॅब चालक श्रीराम मधुकर घारबुडे (वय -32) याच्या विरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला हडपसर परिसरातील मगरपट्टा सिटी परिसरातून सेनापती बापट रस्त्यावरील खासगी कंपनीच्या कार्यालयात निघाली होती. प्रवासात कॅब चालक श्रीराम घारबुडे याने मोटारीच्या आरशाची दिशा जाणीवपूर्वक बदलली. त्याने प्रवासी महिलेकडे एकटक पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोटारीत स्वतःची पँट उघडून अश्लील वर्तन केले. त्यामुळे महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस जगताप याबाबत पुढील तपास करत आहेत.

चार लाखांचे मंगळसूत्र चोरीस

रस्त्याने पायी चाललेल्या महिलेला पोलिसाची भीती दाखवून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 3 लाख 85 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना दोन एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास बिबवेवाडीतील लोअर इंदिरानगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला लोअर इंदिरानगर परिसरात राहायला असून 2 एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास त्या स्वामी समर्थ मंदीर परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेला अडवून, पुढे पोलिस आहेत. तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा. असे बोलण्यात गुंतविले. त्यानंतर महिला गळ्यातील मंगळसूत्र काढत असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी 3 लाख 85 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव तपास करीत आहेत.