आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी सोहळ्यांवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर पुष्पवृष्टी:सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

माऊली...माऊलीच्या जयघोषात पुण्यामध्ये लाखो वारकऱ्यांसोबत आलेल्या जगदगुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर बुधवार 22 जून रात्री पुष्पवृष्टी करण्यात आली.

ज्ञानोबा...माऊली... तुकाराम आणि 'जय जय राम कृष्ण हरी ' च्या जयघोषासोबत गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी वारकऱ्यांनी आरोग्यदायी, निर्मल आणि हरित महाराष्ट्रासाठी गणराया चरणी साकडे घातले.

उत्साहात केले स्वागत

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जगदगुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व विश्वस्तांचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अनेक उपक्रमांचे आयोजन

वारीची शेकडो वर्षांची परंपरा असून दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचे उत्साहात स्वागत केले जाते. यंदा ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची सुरुवात झाली असून हरित वारी- वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी आणि वारकऱ्यांकरता उपक्रम राबवण्यात येणार आहेत. वारकऱ्यांनी देखील या उपक्रमांमध्ये सहभागी होत, सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

वारकऱ्यांसाठी सेवा

आषाढी वारीच्या निमित्ताने दगडूशेट गणपती ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सेवा तसेच सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे पदाधिकारी महेश सूर्यवंशी यांनी दिली. दगडूशेठ मंदिर परिसराच्या जवळच तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. तसेच भवानी पेठेतील मंदिरात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे विश्रांतीस्थान आहे. दोन्ही ठिकाणी ट्रस्टतर्फे फराळ, आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहेत. वारकऱ्यांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.