आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंदी चित्रपटसृष्टीतील “ट्रॅजेडी क्वीन’ असा लौकिक असणाऱ्या अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या अजोड अभिनयाने सजलेल्या “पाकिजा’ या गाजलेल्या चित्रपटाचा सुमारे पंधरा वर्षांचा प्रवास दाखवणारे दुर्मिळ फुटेज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाले आहे. मीनाजींच्या स्मृतिदिनी (३१ मार्च) हे चित्रीकरण मिळावे, हा सुंदर योगायोग म्हणावा लागेल.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, “हे रीळ अठरा मिनिटांचे आहे. १६ एमएमवर चित्रित केले आहे. त्यात चित्रपटाशी संबंधित अनेक छायाचित्रे आहेत. ‘इन्ही लोगों ने’ या गाण्याचे कृष्णधवल चित्रीकरण आहे. यामध्ये मीनाजी अगदी तरुण दिसत आहेत. तसेच मोहंमद रफी साहेबांनी गायलेली ‘जाये तो जाये कहां, अब ये तेरा दीवाना’ ही कव्वाली आहे, जी प्रदर्शित चित्रपटात नाही. या रीळमधील चित्रीकरण अगदी सुरुवातीचे आहे कारण क्लिपर बोर्डवरील तारीख १६ जुलै १९५६ अशी आहे. पंधरा वर्षे रेंगाळलेला हा चित्रपट मराठा मंदिर येथे ४ फेब्रुवारी १९७२ रोजी प्रदर्शित झाला होता. त्या प्रीमियर शोचे चित्रीकरणदेखील या रीळमध्ये आहे.
मीनाजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या सर्वात गाजलेल्या चित्रपटाचे एक मूळ चित्रीकरण गवसावे, ही आनंदाची गोष्ट आहे. प्राथमिक देखभालीनुसार या रिळावर ओरखडे उमटले आहेत आणि रंगही फिके पडले आहेत. आधुनिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून हा खजिना रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू, असे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.