आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद जिल्ह्यातील परांडाचे विधानसभा सदस्य आणि माजी जलसंपदा मंत्री, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीला वरवंड येथे पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला. ते स्वतः या गाडीतून प्रवास करत होते. याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
आमदार तानाजी सावंत यांचे चालक सोनबा शंकर देवकाते, आमदार तानाजी सावंत व इतर काही लोक टोयोटा कंपनीची लॅन्डक्रुझर कारगाडीमधुन उस्मानाबाद येथुन सोलापूर-पुणे महामार्गाने पुणे येथे जाणेसाठी निघाले होते. शनिवारी रात्री वरवंड (ता.दौंड) गावच्या हद्दीत महामार्गाच्या डाव्या बाजूच्या मार्गिकेतील कंटेनर चालकाने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना कोणताही इशारा न देता त्याची मार्गिका सोडून कंटेनर धोकादायकरित्या अचानक उजव्या बाजूच्या मार्गिकेवर घेतल्याने आमदार सावंत यांच्या गाडीच्या उजव्या बाजूला जोरात धडक बसून हा अपघात झाला आहे.
कंटेनर मोठ्या मशनरी घेऊन जात होता, दरम्यान यातील एक मशीन ही थोडी कंटेनरच्या बाहेरच्या बाजूने निघाली होती. त्यात या कंटेनरच्या रिफ्लेक्टर नव्हते, त्यामुळे त्याचा अंदाज चालकाला आला नाही. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण सावंत यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. रोहिदास वाघमोडे असे कंटेनर चालकाचे नाव असून या प्रकरणी सावंत यांचा गाडीचे चालक यांनी हा अपघात कंटेनर चालकामुळे झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
या अपघातात कारचे थोडे नुकसान झाले असून आमदार सावंत यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नसून ते सुखरुप असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे. याबाबत यवत पोलिस अधिक तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.