आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद:चंद्रकांतदादांविरुद्ध राज्यभर संताप; चिंचवडमध्ये तोंडावर शाई फेकली

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठणच्या कार्यक्रमात महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जळगाव व पुण्यात पाटील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करून अॅट्रॉसिटी नोंदवण्याची मागणीही करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजता पिंपरी-चिंचवड भागात श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाच्या उद‌्घाटनासाठी जाताना पाटील यांच्या चेहऱ्यावर एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी करत शाई फेकली. पोलिसांनी तातडीने त्याच्यासह तिघांना ताब्यात घेतले. ते कोणत्या संघटनेचे होते हे स्पष्ट झाले नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतरांनी या घटनेचा निषेध केला. दरम्यान, पुणे, औरंगाबाद, नाशिक, धुळे, अमरावती, नांदेड आदी शहरांतही विविध संघटनांनी पाटील यांच्याविरोधात आंदोलने केली.

तीन हल्लेखोर अटकेत शाईफेक करणारा मनोज भास्कर गरबडे, त्याचे साथीदार विजय धर्मा ओव्हाळ व धनंजय इचगज यांना पोलिसांनी अटक केली. मनोज हा समता दलाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. त्याच्या समर्थनार्थ पिंपरी पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला होता. भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने गोळा झाले होते.

आता हे थांबवा : भुजबळ ‘ते कार्यकर्ते कोण हे माहीत नाही, पण फुले-शाहू-आंबेडकरांचे अनुयायी असतील. सातत्याने जी चुकीची वक्तव्ये केली जात आहेत त्यामुळे राज्यात असंतोष वाढतोय. पाटलांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे यावर आता थांबलं पाहिजे. कुणाला इजा होईल अशी आंदोलने करू नयेत,’ असे छगन भुजबळ म्हणाले.

सुषमा अंधारेंचा राजीनामा उद्धव सेनेच्या सुषमा अंधारेंनी डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्यपदाचा राजीनामा देत पाटील यांचा निषेध केला. ही समिती उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या अखत्यारीत येते. त्या खात्याचे मंत्रीच अपशब्द वापरत आहेत. या पदापेक्षा बाबासाहेबांचा सन्मान मला मोलाचा आहे,’ असे त्या म्हणाल्या.

हिंमत असेल तर समाेर या : पाटील चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘झुंडशाहीला मी घाबरत नाही. हिंमत असेल तर समोर येऊन बोलावे. मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून महाराष्ट्र पेटवलाय. मी शिवाजी महाराज, बाबासाहेबांबद्दल चांगलं बोललो हे दाखवले नाही. गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत पोहोचला हेच सरंजामशाहीला सहन होत नाहीय.’ आ. राम कदम म्हणाले, ‘दादा चुकीचे बोललेच नाहीत. पण सरकार पडल्याच्या निराशेतून असे प्रकार घडवले जाताहेत. आमचा अंत पाहू नका. अशा लाेकांना आम्ही घरात घुसून प्रत्युत्तर देऊ शकतो.’

बातम्या आणखी आहेत...