आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावी या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) चाळीस घटक संस्थांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 150 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी गुरुवारी (04 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, प्रबंधक डॉ. सविता केळकर यावेळी उपस्थित होते.
इथे असणार कार्यक्रम
डीईएसच्या संस्थापक दिनानिमित्त मंगळवारी (9 ऑगस्ट) फर्ग्युसन महाविद्यालयात मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचर्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य सेनानी आणि डीईएसचे संस्थापक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, माधव बल्लाळ नामजोशी, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, वामनराव आपटे यांच्या वंशजांचा सन्मान संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते बुधवारी (10 ऑगस्ट) करण्यात येणार आहे.
50 विद्यार्थ्यांचा सहभाग
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी समाजाच्या विविध घटकांतील पन्नास हजार नागरिकांना राखी बांधण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ याच दिवशी करण्यात येणार आहे. डीईएसच्या विविध घटक संस्थांतील 50 हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
रक्षाबंधनानिमित्त खास कार्यक्रम
फर्ग्युसन महाविद्यालयात रक्षाबंधनानिमित्त ‘राष्ट्रीय एकात्मता’या विषयावर अनुराधा प्रभुदेसाई यांचे गुरुवारी (11 ऑगस्ट) व्याख्यान होणार आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या (आयएमडीआर) वतीने ‘अभिवृद्धी-मेकिंग इंडिया अ फाइव्ह डॉलर इकॉनॉमी’या पुस्तकाचे प्रकाशन राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या हस्ते होणार आहे.‘अजिंक्य भारत’या वैशिष्ट्यपूर्ण फॅशन शोचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँम्फिथिएटरमध्ये शुक्रवारी (12 ऑगस्ट) करण्यात येणार आहे.‘सुभद्रा के. जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग’आणि ‘ब्रिजलाल जिंदल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’चे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. टिळक रस्त्यावरील डीईएस सेकंडरी स्कूलमध्ये परमवीर चक्र विजेत्यांच्या भित्तिचित्राचे अनावरण कॅप्टन दीपक आगाशे यांच्या हस्ते होणार आहे.
‘हर घर तिरंगा’उपक्रम
संस्कृत दिनानिमित्त ‘राष्ट्र विकासासाठी संस्कृताध्यायन’ या संकल्पनेवर प्रदर्शन 13 ऑगस्टला होणार आहे. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रम‘माअंतर्गत घरोघरी तिरंगा ध्वज उभारण्याच्या उद्देशाने, राष्ट्रध्वजांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. रविवारी (14 ऑगस्ट) सकाळी शहराच्या विविध भागांतून विद्यार्थ्यांच्या तीन शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘उनकी याद करे’ या महानाट्याचे सादरीकरण ‘बीएमसीसी’च्या मैदानावर करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.